‘राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर…’; परदेश दौऱ्यावर गेल्यावरून भाजपचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा, शेअर केलं व्यंगात्मक पोस्टर

देशात विविध राजकीय घडामोडी घडत असताना आणि नवरात्रीसारखा पवित्र सण सुरू असताना राहुल गांधी देशामध्ये उपस्थित नसल्याचे सांगत भाजपने त्यांच्या राजकीय उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर…’; परदेश दौऱ्यावर गेल्यावरून भाजपचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा, शेअर केलं व्यंगात्मक पोस्टर
Rahul Gandhi foreign trip controversy

भारतीय जनता पक्षाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ताज्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. देशात विविध राजकीय घडामोडी घडत असताना आणि नवरात्रीसारखा पवित्र सण सुरू असताना राहुल गांधी देशामध्ये उपस्थित नसल्याचे सांगत भाजपने त्यांच्या राजकीय उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक विशेष पोस्ट आणि व्यंग्यात्मक पोस्टर शेअर करत राहुल गांधींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

हेही वाचा – दिल्लीच्या दसऱ्याची देशभरात चर्चा! रावणासोबत 30 फुटांच्या ‘झुरळाचे’ही होणार दहन; रामलीला आयोजकांचा अनोखा निर्णय

‘विश्रांती आणि मौजमजेला प्राधान्य’ असल्याचा दावा

भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी आपल्या सोशल मीडिया संदेशात म्हटले आहे की, राहुल गांधी नेहमीप्रमाणे तेच करत आहेत जे त्यांना सर्वाधिक आवडते म्हणजेच विश्रांती घेणे आणि सुट्टीचा आनंद उपभोगणे. भंडारी यांनी आपल्या पोस्टमध्ये उपरोधिक शब्दांत म्हटले की, राहुल गांधी सध्या देशात नाहीत. नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत ते परदेशात नेमके काय करत आहेत? ते केवळ सुट्टी घालवत आहेत की देशात अराजकता पसरवणाऱ्या आपल्या साथीदारांना भेटण्यासाठी गेले आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जे नेते नियमित कामापेक्षा मौजमजेला आणि वैयक्तिक सुट्ट्यांना अधिक प्राधान्य देतात आणि नंतर निवडणूक प्रक्रियेवर किंवा मतांच्या चोरीवर निराधार आरोप करतात, अशा नेत्यांकडून देशहिताची काय अपेक्षा ठेवणार, असा सवालही त्यांनी केला.


सोशल मीडियावर व्हायरल झालेले पोस्टर

प्रदीप भंडारी यांनी शेअर केलेल्या एका डिजिटल पोस्टरने सोशल मीडियावर मोठे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरमध्ये राहुल गांधींना एका विशिष्ट ‘व्हॅकेशन मोड’मध्ये दाखवण्यात आले आहे. त्यांच्या एका हातात सुटकेस असून मागे विमान उडताना दिसत आहे. या पोस्टरवर मोठ्या आणि ठळक अक्षरांमध्ये, “राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर!”, “देशात प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना, राहुलजी मोकळ्या हवेसाठी परदेशात रवाना!” आणि “हॉलिडे मोड: ऑन” असा मजकूर लिहिण्यात आला आहेत. दरम्यान, भाजपने नवरात्रीच्या काळात परदेशात जाण्यावरून हा मुद्दा लावून धरला असला, तरी यावर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version