मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला असून महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेवरील वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे. ज्या मतदारांच्या माध्यमातून महायुतील विजयी झाली, त्यांनी किती उत्स्फुर्तपणे मतदान केले, माहिती आहे का. सरकारनं याहीवेळी मतदानाकरता भरपगारी सुट्टी जाहीर केली होती. मात्र किती टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
यंदा मुंबईकर मतदारांनी 53 टक्के मतदानाची नोंद केली आहे. यातील सर्वाधिक मतदान हे भांडुप परिसरातील प्रभाग क्रमांक 164 येथे झाले असून ते 64.53 टक्के आहे. एकीकडे भांडुपमधील मतदार उत्साहाने बाहेर पडलेलं असताना दुसरीकडे उच्चभ्रू वस्तीतील 227 प्रभागांतील परिसरात मतदारांकडून केवळ 20 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, 1992 पासून झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये मतदानाची यंदाची टक्केवारी ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक टक्केवारी आहे. सर्वाधिक मतदान 2017 च्या पालिका निवडणुकीत नोंदवली गेली असून ती 55.58 म्हणजे जवळपास 56 टक्के नोंदविण्यात आली होती.
मुंबईत 15 जानेवारी रोजी सकाळी मतदानाचा उत्साह पाहून 2017 चा मतदानाचा टक्का यंदा पार होणार अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, मतदार याद्यांच्या गोंधळामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. परिणामी, या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरण्यापेक्षा अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणून मतटक्क्यात घट झाल्याच्या चर्चा आहेत. प्रशासनाकडून मतदारांना वेळेत मतचिठ्ठया न पोहोचल्याने मतदार केंद्राचा घोळ झाला. शिवाय अनेक मतदारांची नवे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांनी मतधिकार न बजावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या मतटक्क्यात घसरण झाली.
25 लाख महिलांचा सहभाग मुंबई पालिकेच्या 227 जागांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानासाठी 1,03,44,315 मतदार पात्र होते. यात 55,16,707 पुरुष, तर 48,26,509 महिला तर 1,099 इतर मतदारांची संख्या होती. यापैकी 54 लाख 76 हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 29 लाख पुरुषांनी, तर 25 लाख महिलांचा सहभाग आहे.
हेही वाचा : ZP Elections 2026: ग्रामीण भागातील राजकीय समीकरण बदलणार? जिल्हा परिषद निवडणुकांत ‘ओबीसी बहुजन आघाडी’ची एन्ट्री
दरम्यान, महापालिकेच्या अधिकृत एक्स पोस्ट सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यांनी नमूद केले की, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबईकर नागरिक, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, प्रसार माध्यमे, सर्व यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, अपर जिल्हाधिकारी (कोकण विभाग) तथा महानगरपालिका निवडणूक समन्वयक सहायक फरोग मुकादम, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा व अधिकारी-कर्मचारी, कामगार यासोबतच मुंबई पोलीस दलातील सुमारे ३० हजार अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष बंदोबस्तात कार्यरत होते. तसेच केंद्र सरकार, राज्य शासन, विविध प्राधिकरणे, बँका आणि निमशासकीय संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी यांनीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले.
मुंबई महानगरातील 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदारांपैकी सुमारे 54 लाख 76 हजार 043 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 52.94 टक्के मतदानाची नोंद झाली.