BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी महत्त्वाचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून, त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधीच ही घडामोड घडत असल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील युतीसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आघाडी झाली आहे. मात्र या युतीत राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने पक्षातील असंतोष उफाळून आला होता. राष्ट्रवादी पवार गटाने किमान २२ जागांची मागणी केली होती, परंतु उबाठा-मनसे युतीकडून केवळ १० जागा देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईतील अनेक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार नाराज झाले होते.
या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर आता मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. जागावाटप प्रक्रियेत आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही, अशी भावना राखी जाधव यांच्यासह अनेक नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विशेषतः घाटकोपरसारख्या महत्त्वाच्या भागात पक्षाची ताकद असूनही योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याने नाराजी वाढली. राखी जाधव या मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक मजबूत चेहरा मानल्या जात होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन बांधणीवर भर देण्यात आला होता. मात्र त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे घाटकोपरमधील राष्ट्रवादीचा बुरुज कोसळल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, राखी जाधव यांच्या भाजप प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यांच्या हालचालींमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे, भाजपसाठी हा प्रवेश मुंबईतील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
याशिवाय, ठाकरे गटासोबतच्या युतीत अपेक्षित जागा न मिळाल्याने राखी जाधव यांनीच काही इच्छुक उमेदवारांना अजित पवार गटात प्रवेश करण्याची सूचना दिल्याची चर्चा देखील सुरू आहे. आता त्या स्वतः भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडणाऱ्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, आगामी दिवसांत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत.