Rupali Thombare: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली पहिली आणि सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रातील माता-भगिनींना सुरक्षिततेचे आश्वासन दिल्याबद्दल मी सुनेत्रा वहिनींचे आभार मानते,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
‘सुनेत्रा वहिनींनी माता-भगिनींना आश्वासित केले’
रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्रातील महिलांना हे पटवून दिले आहे की तुम्ही सुरक्षित आहात, काळजी करू नका. अजितदादांच्या पाठीशी त्या कणखरपणे उभ्या आहेत आणि महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भोंदू बाबाच्या प्रकरणात चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेतलाच होता, पण आता प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेऊन महिलांना न्याय दिला आहे.”
‘चाकणकरांचे कृत्य पक्षाशी संबंधित नव्हते’
यावेळी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केले की, रुपाली चाकणकर यांनी केलेले कृत्य हे त्यांचे वैयक्तिक होते. “मुळात चाकणकरांचे जे काही कृत्य समोर आले आहे, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नव्हता. त्यांनी त्या संविधानिक पदावर असताना जे काही केले, ते त्यांचे वैयक्तिक कृत्य होते. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या आणि माता-भगिनींच्या मागणीवरून त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले आहे,” असा दावा ठोंबरे यांनी केला.
कणखर पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार
सुनेत्रा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. “ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी या प्रकरणात लक्ष घातले आणि महिलांना आश्वासित केले, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. दादांच्या मागे त्या अत्यंत खंबीरपणे उभ्या आहेत,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले. या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.