भंडारा: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असंही ते म्हणाले आहेत. जर कुणी बंडखोरी केली तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशाराही त्यांनी दिला. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "येत्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो. एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळे चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका. आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे."
पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होतील असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. भंडारा भाजपच्या वतीने दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana: भाऊबीजेच्या आधी सरकारची मोठी घोषणा! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 रुपयांचा हप्ता
'एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल'
बावनकुळे म्हणाले की, "नेत्यांनी विचार करावा. आवेशात, तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण खडा तमाशा करतो. एक चुकीचे बटन, एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही. पण, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या योजनांचा यामुळे बट्ट्याबोळ होईल. आपल्या पक्षात एका जरी कार्यकर्त्यांने बंडखोरी केली तरी, पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षासाठी बंद होतील, हे सर्वांनी लक्षात ठेवावे."
'जेवढा पैसा लागेल तेवढा देईन'
पुढे म्हणाले बोलताना त्यांनी म्हटलं की, "भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या चारही जागा भाजपने लढवाव्यात. यासाठी 51 टक्क्यांची लढाई लढावी. भंडारा, पवनी, साकोली, तुमसरसाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे. विधानसभेत आमदार निवडून आणण्यासाठी जेवढी ताकद लावली, त्यापेक्षा जास्त ताकद भंडारा जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी लावणार आहे."