छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात एक आगळा-वेगळा प्रकार पाहायला मिळाला. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, नेते-पदाधिकारी मोठ्या जल्लोषात अर्ज भरण्यासाठी येत असतात. मात्र आज सकाळी एका उमेदवाराने वेगळ्याच पद्धतीने अर्ज भरून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विभागीय आयुक्त कार्यालयात चक्क एक अंत्ययात्रा धडकली. विशेष म्हणजे तिरडीवर असलेली व्यक्ती जिवंत होती आणि तिनेच स्वतःची अंत्ययात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. हे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील असल्याचे समोर आले आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना रमेश पाटील म्हणाले, “सर्व राजकीय नेते मुर्दाड झाले आहेत, त्यांना जागं करण्यासाठी मी तिरडीवर आलो. पदवीधर आमदार पेपरफुटीच्या मुद्द्यावर आणि विद्यार्थी, शिक्षक जेव्हा टोकाचं पाऊल उचलतात तेव्हा कोणीही काही बोलत नाही, म्हणून मी हा प्रकार केला.”
दरम्यान, या स्टंटबाजीमुळे पोलिसांनी त्यांची तिरडी जप्त केली आहे. मात्र आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आगळा-वेगळा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.