Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व सहकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. 28 जानेवारी रोजी झालेल्या या दुर्दैवी अपघाताची केवळ सीआयडी (CID) चौकशी करून न थांबता, न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोकांच्या मनातील शंकेचे काहूर; सीसीटीव्ही फुटेज कुठे?
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या 14 दिवसांपासून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. “दादा विमानात बसले तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? अपघात नेमका कसा झाला?” असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या सर्व शंकांचे निरसन व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन स्वीकारताना मुख्यमंत्री स्वतः भावूक झाले होते. या विषयावर चर्चा करण्यासाठी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक दिवसाची विशेष चर्चा घडवून आणावी, अशी मौखिक मागणीही मिटकरी यांनी केली आहे.
सुनेत्रा पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट; विलीनीकरणाचा निर्णय वहिनींकडेच
अजित पवारांच्या अपघातानंतर पक्षाची धुरा कोणाकडे असेल, याबाबतही मिटकरी यांनी मोठे संकेत दिले आहेत. सुनेत्रा पवार या लवकरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. “सुनेत्रा वहिनींनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे, अशी आम्हा सर्व सहकाऱ्यांची भावना आहे,” असे मिटकरी म्हणाले. पक्षाचे विलीनीकरण करायचे की स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे, याचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांनाच असतील आणि त्यांनी घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संकटकाळात मुख्यमंत्र्यांचा आधार; राष्ट्रवादीकडून कृतज्ञता
या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. संकटकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे एका भावासारखे उभे राहिले, याबद्दल पक्षाने कृतज्ञता व्यक्त केली. अपघाताची CID चौकशी लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे ऋण व्यक्त करतानाच, सविस्तर आणि पारदर्शक चौकशी व्हावी हीच कार्यकर्त्यांची मुख्य मागणी आहे. लवकरच विलीनीकरणाबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही यावेळी मिटकरी यांनी सांगितलं.