मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घटना समोर आली आहे. मनसे पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यंदाचा दीपोत्सव विशेष आहे. कारण, शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याचे उद्घाटन यंदा चक्क ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, संजय राऊतांसह इतर मंडळी उपस्थित होती.
मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आलं. राज ठाकरे यांचं कुटुंब आणि उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब यावेळी हजर होतं. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेतेही हजर होते. शिवाजी पार्कवर येण्याआधी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब भाऊ राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गेले होते. त्यानंतर एकत्रच कारने कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते.
हेही वाचा: Gujarat Cabinet Expansion: रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा फक्त 3 वर्षांत गुजरात सरकारमध्ये मंत्री; जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास
दीपोत्सवाचं उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती, व्यासपीठावर दीपोत्सवाची आकर्षक लायटिंग सुरू करण्यासाठी बटण दाबायचे होते. राज यांनी उद्धव यांना आग्रह केला. त्यावेळी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागेच होते. रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांना पुढे येण्यास सांगितलं. पण, तोपर्यंत उद्घाटन पार पडलं होतं. उद्धव ठाकरे यांचे नाव मनसेच्या दीपोत्सवाच्या अधिकृत पत्रिकेत छापण्यात आले होते. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.