राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाला सावरलं. उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतले आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच सुनेत्रा पवारांनी मोठी भूमिका बजावली आहे. अशातच सुनेत्रा पवार यांची वेगळीच राजकीय रणनिती पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या दिल्ली दौऱ्यावर असून भाजप वरिष्ठ नेत्यावांसोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बैठक घेणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवनाच्या परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे माजी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशिवाय इतर भाजप पक्षश्रेष्ठ्यांची उपमुख्यमंत्री सुनिता पवार भेट घेणार आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काल रात्रीच राजधानी दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्या होत्या. राज्यसभा खासदार म्हणून सुनेत्रा पवार शेवटची सही करून खासदारकीचा राजीनामा देतील अशी माहिती मिळत असून याचसाठीच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या असल्याचं समोर येत आहे. यानिमित्ताने भाजप पक्षश्रेष्ठीसोबत सुनेत्रा पवार राजकीय खलबतं करण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 6 एप्रिल रोजी बारामती विधानसभा पोटनिवडणूक पूर्वी सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल देखील संसद भवनाच्या परिसरातील बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे राज्यसभेच्या कामकाजात सुनेत्रा पवार सहभागी होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे.
जय पवारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती केल्यानंतर आता जय पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी जय पवारांचा पक्षाच्या कोणत्याही जबाबदारीसाठी हातभार लागलेला नाही. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यामुळे आता एकीकडे पार्थ पवार राज्यसभेत खासदार होऊन पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील.
तटकरे-पटेलांच पद गायब?
सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीला पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. यात सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गरजे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे. तर सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तर संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा यांचा उल्लेख केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांचा उल्लेख यात करण्यात आला नाही तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही.