मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील दौऱ्यावर येणार आहेत. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड झाल्यानंतर आणि त्यांच्या निकटवर्तीय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढल्यानंतर या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुख्यमंत्री फडणवीस खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी करणार आहेत. तसेच खुंटेफळ येथे बोगदा कामाचे भूमिपूजन आणि श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) समाधीमंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. हे भूमिपूजन बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आणि दुपारी अडीच वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, यामध्ये महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, ह.भ.प. मधुकर महाराज शास्त्री, गुरूवर्य अशोकनाथ पालवे महाराज, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, तसेच माजी आमदार साहेबराव नाना दरेकर आदींचा समावेश आहे.
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन क्रमांक ३ हा प्रकल्प खुंटेफळ प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पातून आष्टी तालुक्याला 1.68 टीएमसी पाणी मिळण्याची अपेक्षा असून, शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईनमधून हे पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे हा दौरा आष्टीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.