Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीकरांना मोठा दिलासा देणारी भूमिका मांडली आहे. धारावी कोणत्याही खासगी व्यक्तीच्या घशात घातलेली नाही, असा ठाम दावा करत त्यांनी पुनर्विकास प्रक्रियेत प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. धारावीतील प्रचार सभेत बोलताना त्यांनी सरकारची भूमिका आणि पुढील आराखडा सविस्तरपणे मांडला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावीच्या पुनर्विकासाबाबत केवळ चर्चा करतच गेली ३० वर्षे वाया गेली. मात्र, त्यांच्या सरकारने केवळ घोषणा न करता ठोस निर्णय घेतला आहे. धारावीतील पात्र तसेच अपात्र नागरिकांनाही या पुनर्विकासाचा लाभ मिळणार असून कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. ‘एक झोपडी तोडून दुसरी उभारणे’ हा जुना विचार आम्ही नाकारला असून, अधिक चांगल्या जीवनमानाचा विचार करून नवे डिझाइन तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, धारावीत जर केवळ एसआरए योजना राबवली असती तर उंच, गर्दीच्या इमारती उभ्या राहिल्या असत्या. त्यामुळे सरकारने हा पर्याय टाळला. नव्या पुनर्विकास योजनेत प्रत्येक पात्र नागरिकाला किमान ३५० चौरस फूट घर मिळणार असून परिसरात पाणी, वीज, रस्ते, उद्याने, मैदाने यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे, या घरांसाठी मेंटेनन्सचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
धारावी केवळ आशियातील मोठी झोपडपट्टी नसून ती मेहनती लोकांची, उद्योगधंद्यांची आणि आर्थिक चक्राची ओळख आहे, असं सांगत फडणवीस यांनी धारावीच्या वैशिष्ट्यांवर भर दिला. कुंभारवाडा, चामड्याचे उद्योग, लघुउद्योग, फूड इंडस्ट्री आणि कलाकुसर यामुळे धारावी एक स्वयंपूर्ण आर्थिक इकोसिस्टम असल्याचं त्यांनी नमूद केलं. पुनर्विकास करताना ही ओळख जपली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुनर्विकासाच्या माध्यमातून धारावीत हिरवळ वाढवली जाईल, उद्याने आणि मोकळी मैदाने तयार केली जातील. पुढील पाच वर्षे काही वर्गांना राज्य सरकारकडून करसवलत देण्याचाही विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, अपात्र ठरवण्यात आलेल्या नागरिकांनाही राहण्यासाठी हक्काचं घर देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘धारावी कोणत्याही विकासकाला लाटण्यासाठी दिलेली नाही. डीआरपी आणि एसआरएची भागीदारी आहे, त्यामुळे कुणीही धारावीवर डोळा ठेवून गैरफायदा घेऊ शकणार नाही,’ असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीकाही केली. आपल्याला खोट्या प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एसआयटी अहवालामुळे सत्य समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. यातून सूडाच्या राजकारणाचा पर्दाफाश झाल्याचा दावा त्यांनी केला.
प्रचाराचा शेवट करताना फडणवीस म्हणाले की, मतदानानंतर सरकार धारावीकरांची जबाबदारी घेईल आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. धारावीच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.