Eknath Shinde: हर्षवर्धन सपकाळांच्या आक्रमक टीकेवर एकनाथ शिंदेंचा थेट पलटवार; म्हणाले, ‘हा तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार…’

सपकाळांच्या या वादग्रस्त टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे, अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांचा तीव्र निषेध केला आहे.<br/>

Eknath Shinde: हर्षवर्धन सपकाळांच्या आक्रमक टीकेवर एकनाथ शिंदेंचा थेट पलटवार; म्हणाले, ‘हा तर सूर्यावर थुंकण्याचा प्रकार…’

Eknath Shinde: नाशिकच्या चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या महामोर्च्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळवण्यासाठी निघालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्ला चढवला. सपकाळांच्या या वादग्रस्त टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, “हा प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांचा तीव्र निषेध केला आहे.

शेजारी देश कांदा घ्यायला तयार नाहीत – हर्षवर्धन सपकाळांचा थेट निशाणा
चांदवड येथील शेतकरी आंदोलनात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर कडाडून टीका केली. आंतरराष्ट्रीय संबंध आणि कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे बांगलादेश आणि श्रीलंका यांसारखे शेजारी देश आपला कांदा घ्यायला तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत हे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत कांदा उत्पादकांना न्याय मिळणार नाही, असे सांगत कांद्याची सर्व खरेदी केवळ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच (APMC) झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी – मुख्यमंत्री फडणवीसांवर प्रहार
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार तोफ डागली. राज्यात “सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी” अशी आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांना 24 रुपयांनी कांदा खरेदीचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही, असे नमूद करत हे सरकार केवळ आश्वासनांची खैरात करणारे खोटारडे सरकार आहे, अशी घणाघाती टीका सपकाळ यांनी व्यासपीठावरून केली.

हेही वाचा – Political News: राजकारणात मोठा भूकंप: 3 आमदारांचे थेट राजीनामे; या पक्षात केला प्रवेश, आता चार जागांवर होणार पोटनिवडणूक

कुठे राजा भोज अन् कुठे गंगू तेली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र समाचार घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कडक शब्दांत पलटवार केला. सपकाळांची ही टीका म्हणजे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ हे जेमतेम 1 ते 1.5 वर्षापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. ज्या नेत्यावर ते चिखलफेक करत आहेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे धुरंधर आणि जागतिक स्तरावरील विकासाचे महामेरू आहेत.

पंतप्रधानांवर अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे म्हणजे स्वतःच्या तोंडावर पडण्यासारखे आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी “हा निव्वळ सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे; कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली!” अशा शब्दांत टोला लगावला. या विधानाचा निषेध करावा तेवढा कमीच असल्याचे सांगत, अशा बेजबाबदार वक्तव्यांबद्दल देशातील तब्बल 140 कोटी जनता आगामी काळात काँग्रेसला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number