Devendra Fadnavis: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेमुळे देशाचे संरक्षण क्षेत्र आता पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी शस्त्रास्त्रांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणारा भारत आता जगाला शस्त्रे निर्यात करत आहे. देशाची संरक्षण सज्जता इतकी वाढली आहे की, सीमेवर सलग 360 दिवस म्हणजेच वर्षभर युद्ध सुरू राहिले, तरीही दारुगोळा कमी पडणार नाही इतकी मोठी निर्मिती क्षमता आपण प्राप्त केली आहे,” अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते शिर्डी येथे आयोजित भव्य क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.
आयातीकडून निर्यातीकडे: संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक प्रगती
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात देशाच्या बदलत्या संरक्षण धोरणावर विशेष प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे, असे सांगत त्यांनी मोदी-राजनाथ जोडीच्या यशाचे कौतुक केले. आज भारत केवळ स्वतःच्या संरक्षणासाठीच नाही, तर जगासाठी सर्वोत्तम ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे (Missiles) देशांतर्गत तंत्रज्ञानाद्वारे तयार करत असून संरक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी बनत आहे.
मराठी तरुणाचे कौतुकास्पद पाऊल; क्षेपणास्त्रांमधील ‘तो’ गॅप भरून काढला
संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘निंबे’ उद्योग समूहाचे प्रमुख गणेश निंबे यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी मंचावरून विशेष गौरव केला. भारतीय संरक्षण व्यवस्थेत 70 किमी ते 400 किमी अंतराच्या पल्ल्यामध्ये मारा करणाऱ्या अस्त्रांची मोठी पोकळी होती. गणेश निंबे यांनी 150 ते 300 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करू शकणारी अस्त्रे विकसित करून हा गॅप भरून काढला आहे, ज्यामुळे देशाची ताकद लक्षणीय वाढली आहे.
अफाट उत्पादन क्षमता आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक करार
या नवीन प्रकल्पामुळे सीमेवर सलग 360 दिवस अविरतपणे तोफगोळे आणि दारुगोळा पुरवण्याची अफाट क्षमता देशातच निर्माण झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता थेट इस्रायलसारख्या देशांसोबत महत्त्वाचे व्यावसायिक करार झाले असून, भारतातच संरक्षण क्षेत्राला पूरक असणारी ‘सी-प्लेन’ (Sea Plane) तयार करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.
शांततेचा संदेश पण स्वसंरक्षणासाठी सदैव सज्ज
“युद्ध कोणत्याही राष्ट्राला परवडणारे नसते आणि शांततेच्या मार्गानेच सर्व प्रश्न सुटावेत ही भारताची कायमची भूमिका राहिली आहे. परंतु, स्वसंरक्षणासाठी सदैव सज्ज असणे हे तितकेच गरजेचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य आणि देशाची आजची संरक्षण क्षमता पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केले.