पश्चिम बंगालच्या रणधुमाळीत लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी पार पडलेले मतदान निवडणूक आयोगाने अधिकृतपणे रद्द केले आहे. मतदानाच्या दिवशी फलतामध्ये अनेक गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले असून, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची कडक दखल घेतली आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड आणि लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारींनंतर आयोगाने हा मोठा निर्णय घेतला असून आता या पूर्ण मतदारसंघात पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदानात म्हटले आहे की, 29 एप्रिल 2026 रोजी फलता मतदारसंघातील अनेक केंद्रांवर निवडणूक गैरप्रकार झाले होते. ईव्हीएम (EVM) मशिनवर टेप लावणे आणि मतदारांच्या इच्छेविरुद्ध हस्तक्षेप करणे अशा घटनांची गंभीर दखल घेत आयोगाने चौकशीचे आदेश दिले होते. या वादाच्या केंद्रस्थानी ईव्हीएमची छेडछाड हा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. चौकशी अहवालात तथ्य आढळल्यानंतर, सहाय्यक केंद्रांसह सर्व 285 मतदान केंद्रांवरील मतदान स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
आता फलता मतदारसंघातील सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे 2026 रोजी पुन्हा मतदान होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत ही प्रक्रिया नव्याने पार पडेल. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्याचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असला, तरी फलताचा कौल जाणून घेण्यासाठी आता 24 मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्याच्या उर्वरित 293 जागांची मतमोजणी नियोजित वेळापत्रकानुसार 4 मे रोजीच पार पडेल. फलताचा निकाल स्वतंत्रपणे 24 मे रोजी जाहीर केला जाईल.
यापूर्वी, शुक्रवारी देखील आयोगाने दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम या दोन विधानसभा क्षेत्रांतील 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची घोषणा केली होती. या 15 केंद्रांवर पुनर्मतदान यशस्वीरीत्या पार पडले आहे. या केंद्रांचा निकाल मात्र 4 मे रोजी उर्वरित राज्यासोबतच जाहीर होणार आहे. मात्र, फलता मतदारसंघाच्या बाबतीत संपूर्ण मतदारसंघाचेच मतदान रद्द झाल्यामुळे तेथील राजकीय समीकरणे आता पुन्हा एकदा नव्याने मांडली जाणार आहेत.
लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा पवित्र मानला जातो, मात्र अशा प्रकारच्या छेडछाडीमुळे या प्रक्रियेला गालबोट लागले आहे. "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही" या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाचा हा निर्णय गैरप्रकार करणाऱ्यांसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे. आता 21 मे 2026 रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, फलताची जनता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकते, हे 24 मे रोजीच स्पष्ट होईल.