मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते. त्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रीपदाची अट घातली होती. मंत्रीपद मिळाले नाही, तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली होती. या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी परवानगी दिली होती, असा दावा चव्हाण यांनी केला. मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातील खासदाराला आपल्या पक्षात घेऊन थेट मंत्री करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेरीस होऊ शकला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.