मुंबई: एसटी बँकेच्या संचालकांच्या झालेल्या राड्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडली. आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला, त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आलं म्हणून आम्ही त्यांना ठेचलं अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली आहे. आम्ही प्रसिद्धीसाठी हापापलेले नाही, पण सगळे पुरावे हाती असल्याने आम्ही हे सांगतोय. पोलिसांनी अभ्यासाअंती त्या लिंगपिसाटांवर गुन्हे दाखल केले आहेत असा दावा सदावर्ते यांनी केला. तसेच स्वतःचा बचाव कसा करण्यासाठी विरोधकांनी थातूरमातूर कट रचला असा दावाही सदावर्तेंनी केला.
लाडक्या बहिणींना त्रास दिला
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "एसटी बँकेत जो राडा झाला, त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना त्रास दिला म्हणून आम्ही त्यांना ठेचलं. विरोधकांमध्ये काही लोक असे आहे, जे अहिल्यादेवी होळकरांच्या लेकींवर अपप्रवृत्तीने नजर ठेऊन आहेत. आमच्या काही महिला पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणाचा त्रास देण्यात आला. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ आम्ही त्यांची अंडी केली." पुढे बोलताना, विरोधकांनी मराठा, आदिवासी आणि वंजारी अशा तीन समाजाच्या तीन महिलांना त्रास दिला. विरोधकांनी महिलांना जो त्रास दिला त्यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक झाला, अशा लिंगपिसाटांना ठेचण्यात आल्याचं सदावर्ते म्हटले.
हेही वाचा: Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या हाता-पायाला फ्रॅक्चर?, बँकेतील राड्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमागचे रहस्य काय?
गुणरत्न सदावर्ते यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, एसटी बँकेच्या राड्यानंतर आनंदराव अडसूळ पोलीस ठाण्यात का गेले? अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांवर अत्याचार केलेल्या आरोपींना पाठिंबा देण्यासाठी गेले होते का? त्यांच्याविरोधात बँक बुडवल्याचे आरोप आहेत. आयोगाच्या जातीतील लोकांविरोधातच हा माणूस अत्याचार करत आहे. याचा रोल काय आहे? अडसूळ यांची आयोगावरुन हकालपट्टी करा असे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले आहे.
लय जुनं म्हातारं आहे म्हणून शिंदे साहेब त्याला सोबत ठेवत असतील. लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ द्या असं शिंदे साहेब कधीच म्हणणार नाहीत. आम्ही शिंदे साहेबांकडे आनंदराव अडसूळ यांची तक्रार करणार आहोत असंही सदावर्ते म्हणाले आहेत.