पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभ्या राहिलेला मतभेदाने राज्याच्या राजकरणाचं चित्र पूर्ण बदललं. धनुष्यबाण चिन्ह आणि ‘शिवसेना’ नाव शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा अधिकच वाढला होता. त्यामुळे हे दोन गट पुन्हा एकत्र उभे राहतील, असा विचारही कोणालाही आजपर्यंत पटत नव्हता. पण राजकारणात कधीही कोणी कोणाचा दुश्मन नसतो हे वाक्य पुन्हा एकदा खरे ठरले आणि याचं उदाहरण ठरलं आहे, 'चाकण नगरपरिषद निवडणूक'.
चाकण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना एक असा क्षण पाहायला मिळाला, ज्यामुळे राज्यभरात एकच चर्चा रंगली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते त्याच उमेदवाराच्या समर्थनार्थ एकत्र उभे दिसले. शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांच्या अर्ज दाखल करताना खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे दोघेही उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर आरोपांच्या तोफा डागणारे हे दोन गट एकत्र उभे राहिल्याचे चित्र राजकीय वर्तुळाला दणका देणारे ठरले.
हेही वाचा: Sanjay Raut : तोंडाला मास्क पण तोच करारी बाणा; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी
युतीसारखी दिसणारी ही परिस्थिती काय दर्शवते? चाकणचा हा प्रयोग पुढच्या काळात राज्याच्या राजकारणाला नव्या वळणावर घेऊन जाईल का? या प्रश्नांची चर्चा आता अधिकच तापू लागली आहे. या अनपेक्षित पाठिंब्याबद्दल आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, हा निर्णय राजकीय हेतूने नाही तर भावनिक कारणाने घेण्यात आला आहे. “दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून त्यांना सन्मान म्हणून आम्ही साथ दिली,” असे काळे यांनी सांगितले. तसेच, “ही कोणतीही युती नाही,” हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी स्थानिक नेत्यांना स्वतः निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे चाकणमधील पाठिंबा हा फक्त स्थानिक परिस्थितीसाठी दिलेला निर्णय असून, व्यापक पातळीवरील राजकीय संधान नाही, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. राजगुरूनगर आणि आळंदी येथे ठाकरे गट स्वबळावर लढणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, चाकणमधील ही एकत्रित उपस्थिती राज्याच्या राजकीय समीकरणाला नवा ट्विस्ट देणारी ठरली आहे. कट्टर वैर असलेले दोन गट एका उमेदवारासाठी एकत्र आल्याने पुढे कोणते राजकीय संकेत उमटतात, हे पाहणे अधिकच रोचक ठरणार आहे.
हेही वाचा: CNG Shortage in Mumbai : मुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला; रिक्षा, टॅक्सी सेवा गडबडली