इचलकरंजी: इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून, भारतीय जनता पक्षाने (BJP) दमदार सलामी दिली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले असून, विजयाचा हा ‘चौकार’ मारत भाजपने विरोधकांवर आघाडी घेतली आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता शहरातील राजीव गांधी भवन येथे कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ झाला. 65 जागांसाठी तब्बल 230 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
गुरुवारी झालेल्या मतदानात इचलकरंजीकरांनी 70 टक्के मतदानाचा टक्का नोंदवत लोकशाहीचा उत्सव साजरा केला होता. आता मतमोजणीच्या 11 फेऱ्यांमध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सध्या हाती आलेल्या कलानुसार, भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली असून “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे मतदारांनी विकासकामांना कौल दिल्याचे चित्र दिसत आहे.
प्रमुख लढत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीमध्ये रंगली असून, भाजपच्या या सुरुवातीच्या विजयाने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. उर्वरित जागांचे निकाल जसजसे हाती येतील, तसतसे इचलकरंजीच्या सत्तेची समीकरणे स्पष्ट होतील.