पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरीतील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, या प्रकरणामुळे विविध राजकीय मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकेचा वर्षाव केला. अखेर, अजित पवारांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट; फरार सासरा आणि दीर अटकेत
काय म्हणाले अजित पवार?
'अनेकजण मला लग्नाला बोलवत असतात. जर शक्य असेल तर मी तिथे येण्याचा प्रयत्न करतो. जर मी एखाद्या लग्नाला गेलो आणि काही काळानंतर त्यांच्या सुनेसोबत काही झालं तर त्यामध्ये माझा काय संबंध आहे? मी सांगितलं होतं का असं कर, म्हणून? मला तर काही कळतच नाही. ज्या क्षणी मला या घटनेबद्दलची माहिती मिळाली त्या क्षणी मी पिंपरीच्या सीपींना फोन केला आणि म्हटलं, ''कोणी का असेना, कारवाई करा''. ज्या मुलीने आत्महत्या केली होती, सध्या तिचा नवरा, सासू, नणंद कारागृहात आहेत. सासरा पळून गेला. पण तोही सापडेल. पळून पळून कुठे जातो? यामध्ये माझा काय संबंध? जे लोक प्रेमापोटी मला बोलावतात, मला तिथं जावं लागतं. नाही गेलो तर माणसं रूसतात. आता लग्नाला गेलो म्हणून आम्ही सांगतो का सुनेशी असं वागा, तसं वागा, म्हणून?' असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा: वैष्णवी आणि मयुरीच्या कुटुंबीयांनी केला हगवणे कुटुंबाबद्दल मोठा खुलासा
मी दोषी असेल तर मला फासावर लटकवा:
पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले की, 'जर मी दोषी असेल तर मला फासावर लटकवा. जर या प्रकरणात माझा काही संबंध असेल तर कारवाई करा. उगाच माझी बदनामी केली जात आहे. हगवणेच्या लग्नात मला गाडीची चावी द्यायला सांगितलं होतं. त्यांना चावी देताना मी असं देखील विचारले की, ''तुम्ही स्वखुशीने देत आहात की जबरदस्तीने देत आहात?''. मग माझी का बदनामी करतात? तसंही गुन्हा नोंद झाला आहे आणि मी सीपींना सांगितले होते की, ''हगवणे कुटुंबियांवर कारवाई झालीच पाहिजे'. जर तो माझ्या पक्षाचा सभासद असेल तर मी त्याची हकालपट्टी करतो. अशी माणसं माझ्या पक्षात नको''. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. माणुसकीच्या नात्याने मला जे करावसं वाटलं ते मी केलं. असले नालायक लोक माझ्या पक्षामध्ये नको', असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.