Devendra Fadnavis: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद मुंबईत उमटले आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले. “आजचा दिवस ऐतिहासिक असून बंगालच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
“भाजपच बंगालचा खरा पक्ष”
ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांना ‘बाहेरचे’ म्हटल्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, “मी बंगालमध्ये असताना पत्रकारांनी मला ममता दीदींच्या विधानावर विचारले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, भाजपची निर्मिती ज्यांनी केली ते श्यामा प्रसाद मुखर्जी हेच मुळचे बंगालचे होते. त्यामुळे खरा बंगालचा पक्ष भाजपच आहे. आज बंगालच्या जनतेने मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, तर ‘महापरिवर्तन’ घडवले असून भाजपला तिथे 2/3 (दोन-तृतीयांश) बहुमत मिळत आहे.”
ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या ‘कुशासना’वर प्रहार
बंगालच्या दुरवस्थेबद्दल बोलताना फडणवीसांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “तीस वर्षे काँग्रेस, 36 वर्षे कम्युनिस्ट आणि त्यानंतरची 15 वर्षे ममता दीदींच्या खतरनाक शासनाने बंगालला मागे नेले. एकेकाळी देशाची आर्थिक राजधानी असलेला कोलकाता आज गुंतवणुकीत मागे पडला आहे. देशात येणाऱ्या एफडीआय (FDI) पैकी 0.5 टक्के देखील गुंतवणूक तिथे येत नाही. जवळपास 7,000 मोठ्या उद्योगांनी बंगाल सोडला आणि तिथे ‘जंगलराज’ निर्माण झाले. पण आता मोदीजींच्या व्हिजनमुळे बंगाल पुन्हा उभा राहील.”
घुसखोरी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून निशाणा
बंगालच्या विजयाला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडताना मुख्यमंत्री म्हणाले, “हा विजय केवळ एका राज्याचा नाही, तर भारताला घुसखोरी आणि आतंकवादापासून वाचवणारा विजय आहे. ममता दीदींचे सरकार बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देऊन त्यांना भारतीय कागदपत्रे पुरवत होते. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था तिथे झाली होती. हे घुसखोर भारताच्या सार्वभौमत्वाला आणि रोजगाराला धोका निर्माण करत होते, ज्याला आता जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे.”
हेही वाचा – Puducherry Election Results 2026 : पुदुच्चेरीत एन. रंगासामी यांचा मोठा विजय; NDA ची पुन्हा सत्ता?
चाणक्य अमित शाह आणि टीमचे कौतुक
या विजयाचे श्रेय फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या टीमला दिले. “आधुनिक राजकारणाचे चाणक्य अमित शाहा यांची रणनीती, अध्यक्ष नितीन नवीन यांचे नेतृत्व आणि सुवेंदू अधिकारींसह बंगालमधील भाजप टीमच्या कष्टाचे हे फळ आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा आणि अन्य आमदार उपस्थित होते.