Narhari Zirwal: ‘त्या प्रकरणाशी माझा संबंध निघाला, तर थेट राजीनामा देईन…’; लाचखोरीच्या आरोपावरून नरहरी झिरवळ संतापले

अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

Narhari Zirwal: ‘त्या प्रकरणाशी माझा संबंध निघाला, तर थेट राजीनामा देईन…’; लाचखोरीच्या आरोपावरून नरहरी झिरवळ संतापले

Narhari Zirwal: मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीच्या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून संबंधित विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, 'जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले, तर मी क्षणाचाही विलंब न लावता मंत्रिपदाचा त्याग करेन,' असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.

नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मोठी कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी ढेरंगे याने 50 हजार रुपयांची मागणी केली होती, ज्याचा पहिला हप्ता घेताना तो जाळ्यात सापडला.

झिरवळ यांची स्पष्टोक्ती; "मी कुणालाही पाठीशी घालणार नाही"
या कारवाईनंतर विरोधकांनी आणि माध्यमांनी मंत्र्यांच्या नैतिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना झिरवळ यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, 'विभागाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहेच, ती मी नाकारत नाही. पण संबंधित कर्मचारी बाहेरच्या कार्यालयात कार्यरत होता, त्याचा माझ्या किंवा माझ्या खाजगी सचिवाशी थेट संबंध नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून जाब द्यावाच लागेल. आम्ही कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही.' मंत्रालयातील कार्यालय सील केल्याच्या बातम्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की, 'अशी कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, मी मुंबईत पोहोचल्यावर सत्य परिस्थिती जाणून घेईन.'

हेही वाचा – Vidhan Parishad Election : मोठी राजकीय घडामोड! विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागांसंदर्भात हालचाली

दरम्यान, नरहरी झिरवळ आज दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर ते तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहेत. एसीबीकडून सध्या आरोपी लिपिक राजेंद्र ढेरंगे याच्या निवासस्थानी आणि कार्यालयात झडती सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number