Amol Kolhe : ‘अधिकारी प्रोटोकॉल पाळणार नसतील, तर…’; अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून थेट इशारा

स्थानिकांनी प्रलंबित कामांची जाणीव करून दिल्यानंतर, त्यांनी यापुढे महिन्यातून किमान 1 पूर्ण दिवस फक्त शिरूर तालुका आणि संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांसाठी देण्याचे जाहीर केले.

Amol Kolhe :  ‘अधिकारी प्रोटोकॉल पाळणार नसतील, तर…’; अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून थेट इशारा

Amol Kolhe :  शिरूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामांवरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट जनतेशी संवाद साधत स्वतःची चूक कबूल केली. पूर्वी आमदार अशोक पवार सतत भागात उपलब्ध असल्याने स्वतःच्या उपस्थितीकडे थोडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले. स्थानिकांनी प्रलंबित कामांची जाणीव करून दिल्यानंतर, त्यांनी यापुढे महिन्यातून किमान 1 पूर्ण दिवस फक्त शिरूर तालुका आणि संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांसाठी देण्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर नागरिकांच्या प्रश्नांचा आणि समस्यांचा नियमित पाठपुरावा करण्यासाठी एक समर्पित पीए (Personal Assistant) नियुक्त करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

नवे रस्ते अन् पीएमआरडीए अधिकाऱ्यांना थेट इशारा

नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात 7.5 मीटर रुंदीचा रस्ता आणि बाजूच्या गटाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वाच्या कामाच्या प्रसंगी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) अधिकारी अनुपस्थित राहिल्याने डॉ. कोल्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “प्रोटोकॉल न पाळणाऱ्या आणि मग्रुरी दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आसुडाची भाषा समजावून सांगावी लागेल,” असा इशारा त्यांनी दिला. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची दखल घेत हक्कभंग आणण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच न्हावरे-शिक्रापूर रस्त्याच्या तक्रारींबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर बसवून प्रश्न तात्काळ सोडवण्याचा शब्द त्यांनी दिला.

हेही वाचा – Shiv Sena Hearing : सुनावणीत मोठा ट्विस्ट! एकनाथ शिंदे यांच्या पक्षावरील दाव्यावर कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; वाचा सविस्तर बातमी

रिक्षा-टॅक्सी चालकांचे कल्याण आणि 57 कोटींची तरतूद

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना विविध घटकांना सोबत घेऊन जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाकडून आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महामंडळामध्ये 37,000 हून अधिक कामगारांची नोंदणी झाली असून, त्यांच्यासाठी 57 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगत कौतुक केले. 65 वर्षांवरील चालकांसाठी 10,000 रुपयांचे अनुदान आणि आरोग्य उपचार योजनांचे त्यांनी समर्थन केले. मात्र, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्यांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान असणे आणि नियमांच्या चौकटीत काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ऐतिहासिक दुवा

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी सामाजिक मूल्यांवर प्रकाश टाकला. ‘सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ मालिकेचा संदर्भ देत ते म्हणाले की, “क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एका ठराविक समाजाचे नसून संपूर्ण देशाचा वारसा आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना जोडणारा सर्वात मोठा दुवा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आहेत.” समाजकारणाची हीच धुरा पुढे नेण्यासाठी आपण बांधिल असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number