Mahayuti Conflict: महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतले अंतर्गत मतभेद आता स्पष्टपणे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप–प्रत्यारोपांनंतर रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या तिढ्याची ठळक झलक पाहायला मिळाली. हिवाळी अधिवेशनापूर्वी नेहमीप्रमाणे आयोजित या बैठकीत महायुतीच्या तीनही पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी बैठकीस गैरहजर राहून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. सामान्यतः राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे या बैठकींमध्ये नेहमी दिसतात. परंतु यावेळी राष्ट्रवादीकडून एकही खासदार उपस्थित नव्हता. शिवसेनेतही अशीच परिस्थिती दिसली. लोकसभेतील गटनेते श्रीकांत शिंदे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या ऐवजी नरेश म्हस्के यांनी बैठकीत सहभाग घेतला. या गैरहजेरीमुळे महायुतीत दरी अधिक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा – Manikrao Kokate On BJP : 'भाजप बाटलेला पक्ष…'; माणिकराव कोकाटे यांची बोचरी टीका
दरम्यान, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका येत्या मंगळवारी होणार आहेत. 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असून, त्याआधी महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे जोरदार प्रचार करत आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना फोडण्यापासून ते उमेदवारांचे अपहरण करण्यापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. राज्यातील सत्ता, संसाधनांवरील नियंत्रण आणि राजकीय सत्ता या मुद्द्यांवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमकी अधिक तीव्र झाल्या आहेत. परिणामी महायुतीतील कलह आता चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेना-भाजप संघर्ष शिगेला
दरम्यान, फोडाफोडीचे राजकारण हा मुद्दा महायुतीतल्या तणावाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये भाजपने शिवसेनेचे नगरसेवक आपल्या गळाला लावल्याचा आरोप समोर आला. त्यानंतर शिंदे गटाने मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली होती. तसेच शिवसेना खासदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून भाजपच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावर फडणवीसांनी फोडाफोडीची सुरुवात तुम्हीच केली होती, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. या घटनांनंतर दोन्ही पक्षांत ‘एकमेकांचे कार्यकर्ते न फोडण्याचा’ तात्पुरता तडजोडीचा करार झाला असला, तरी तणाव मात्र अजूनही कायम आहे.