मुंबई : राज्याचे उपमुख्यंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या अकाली निधनाच्या घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाला. हा अपघात बारामतीमध्ये घडला असून त्यांच्यासोबत एक संरक्षक, दोन पायलट, एक प्लेन अटेंडन्ट यांचाही मृत्यू झाला. हे विमान मुंबईहून बारामतीला जात असताना बारामतीत लँडिंगच्या वेळी विमानाचा स्फोट झाला आणि यात अजित पवारांसह आणखी चार जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपला लाडका नेता गमावला, राज्यानं उपमुख्यमंत्री गमावला, तर पवार कुटुंबाने त्यांचा हक्काचा माणूस गमावला. या घटनेनंतरचे घटनास्थळाचे विदारक दृश्य सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. ते पाहून सारेच हळहळले.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : ई-केवायसी भरूनही खात्यात पैसे जमा नाहीत, बहिणींचा संताप
अजित पवार यांच्या अपघातानंतर तेथील स्थानिकांनी आणि पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलतं त्यांना बारामतीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र विमान अपघात इतका तीव्र होती की त्यातील कोणत्याही प्रवाशांचा चेहराही ओळखता येत नव्हता. परिणामी, डॉक्टरांनी अजित पवारांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांच्या अपघाताची बातमी मिळताच पवार कुटुंबिय बारामतीत दाखल झाले. अजित पवार यांचे काका आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार, त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार, दोन्ही मुलं पार्थ आणि जय पवार तसेच जय यांची पत्नीदेखील या ठिकाणी तातडीने पोहोचले. दरम्यान, पवार कुटुंबातील सदस्य युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हेदेखील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
28 जानेवारी रोजी सायंकाळी अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता बारामतीत दाखल झाली होती. त्यांनी अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी रोजी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडीतील घरी नेण्यात आले. यावेळी घरातील आणि गावातील सदस्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांनी पुन्हा एकदा त्यांची अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान मैदानात नेण्यात आली. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शरद पवारांसह राज्यातील सर्व पक्षातील बडे नेते, तसेच केंद्रातील मंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी देखील उपस्थित होते. अजित पवार यांच्या दोन्ही मुलांनी, पार्थ आणि जय यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अजित पवार अतंतात विलिन झाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त झाली. परिणामी, अवघ्या चारच दिवसांत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एकमातने गटप्रमुखपदी नियुक्ती करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान केले. त्यामुळे राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या साक्षीने शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीपासूनच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना उधाण झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतरही या चर्चा सुरूच राहिल्या. दरम्यान, पवार कुटुंबियांकडून कोणीतीही अधिकृत माहितील देण्यात आली नाही. तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीही विलिनीकरणाचा मुद्दा खोडून काढला. पुढे अजित पवार यांच्या निधनाला १२ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघाताचा घटनाक्रम आणि तथ्य लोकांसमोर आणले. यातून हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित झाली. तसेच अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीदेखील रोहित पवार यांनी यावेळी केली. मुंबईसह दिल्लीत देखील रोहित पवारांनी माध्यमांसमोर अपघातातील सविस्तार माहिती आणि प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांचा सत्य जाणून घेण्याचा लढा अजूनही सुरू आहे. दुसरीकडे नुकतेच सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.