Jay Pawar Meets Pinky Mali Family : अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्या केबिन क्रू पिंकी माळी हिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जय पवार आज तिच्या घरी पोहोचले होते. अपघातानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबातील कोणीतरी माळी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले होते. यावेळी जय पवार यांनी पिंकीच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याचा शब्द दिला. मात्र, ही भेट आटोपून बाहेर पडताना एका अनपेक्षित घटनेमुळे जय पवार यांनी सुरक्षेचा विचार करत 18 मजले पायऱ्यांनी उतरण्याचा निर्णय घेतला.
लिफ्टमधून आवाज आला आणि पवारांनी पायऱ्या निवडल्या
पिंकी माळीच्या कुटुंबियांना भेटून जय पवार जेव्हा लिफ्टने खाली येण्यासाठी निघाले, तेव्हा लिफ्टमधून अचानक एक विचित्र आवाज आला. अजित पवारांच्या भीषण विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जय पवार आणि त्यांच्या सुरक्षेतील कर्मचाऱ्यांनी कोणतीही जोखीम न पत्करण्याचे ठरवले. जय पवार यांनी तातडीने लिफ्टचा प्रवास रद्द केला आणि चक्क 18 मजले चालत खाली उतरले. विमान दुर्घटनेनंतर पवार कुटुंब तांत्रिक बिघाड किंवा यंत्रणांबाबत कमालीची सतर्कता बाळगत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
पिंकी माळीच्या आईला मिळणार उत्तम उपचार
पिंकी माळीची आई नुकतीच एका शस्त्रक्रियेनंतर घरी परतली आहे. मात्र, त्यांची प्रकृती अद्याप स्थिर नाही. जय पवार यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, "आई आणि मुलाचे नाते खूप जवळचे असते, हे दुःख सहजासहजी विसरता येणार नाही. मी डॉक्टरांशी बोललो असून, उद्याच त्यांना ज्युपिटर रुग्णालयात हलवले जाईल. तिथे तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील." एक कुटुंब म्हणून आम्ही माळी परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांची दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा; अजित पवार यांच्या अपघाताबाबत नक्की काय झाली चर्चा?
तपास यंत्रणा आणि सीबीआय चौकशीवर भाष्य
अजित पवारांच्या अपघाताबाबत विधानभवनात चर्चा होत नसल्याच्या प्रश्नावर जय पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ब्लॅक बॉक्स आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे घाईचे ठरेल. आम्हालाही वाटते की, या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात यावा." रोहित पवार सध्या या प्रकरणाची माहिती काढत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पत्रकार परिषद का ढकलली पुढे?
पुढच्या आठवड्यात जय पवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आधी नियोजित असलेली पत्रकार परिषद जाणीवपूर्वक पुढे ढकलल्याचे त्यांनी सांगितले. "आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. केवळ अर्धवट माहिती समोर येण्यात काही अर्थ नाही; जेव्हा माझ्याकडे सर्व तथ्ये आणि कायदेशीर माहिती असेल, तेव्हाच मी जनतेसमोर येईल. दादा असते तर त्यांनीही सर्व माहिती घेतल्याशिवाय भाष्य केले नसते," असे जय पवार यांनी स्पष्ट केले. खऱ्या माहितीची प्रतीक्षा असल्याचे सांगत त्यांनी दबावाचे वृत्त फेटाळून लावले.
हेही वाचा - Anil Parab: 'प्रकरण अंगाशी आलं म्हणून महापौरबाईंनी पत्र मागे घेतलं...'; बदल्यांच्या मुद्द्यावरून अनिल परब यांची रितू तावडेंवर टीका