Ashok Kharat Case: महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने खरात हाच या सर्व प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ असल्याचा दावा केला. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आले होते. एसआयटीच्या (SIT) विनंतीनुसार, न्यायालयाने खरातला प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. विशेष म्हणजे, या सुनावणीसाठी कोर्टरूममध्ये चार मोठे स्क्रीन लावण्यात आले होते, ज्याद्वारे आरोपी आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पडली.
कोर्टात नेमकं काय घडलं?
न्यायमूर्ती बी. एन. ईचपुरानी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. यावेळी खरातला स्क्रीनवर पाहताच न्यायाधीशांनी त्याची ओळख पटवण्यासाठी त्याचे नाव विचारले. मात्र, तांत्रिक कारणास्तव खरातचा आवाज स्पष्ट येत नसल्याने न्यायाधीशांनी त्याला “मोठ्याने बोला” अशा सूचना दिल्या.
वकिलांबाबत विचारणा आणि खरातची प्रतिक्रिया
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी खरातला विचारले की, “तुमची बाजू मांडणारे ॲड. भाटे हेच तुमचे वकील आहेत का?” त्यावर खरातने “हो” असे उत्तर दिले. संपूर्ण युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, परंपरेनुसार न्यायाधीशांनी खरातला स्वतःची काही बाजू मांडायची आहे का, अशी विचारणा केली. त्यावर खरातने केवळ हात जोडून “काही नाही” असे उत्तर दिले आणि शांत राहणे पसंत केले.
कोर्टात सरकारी वकिलांचा आक्रमक युक्तीवाद
सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या कूर कृत्यांचा पाढा वाचला. “आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर गर्भपातासाठी तिला बळजबरीने औषधे दिली. ही औषधे त्याने कोठून आणली? तसेच पीडितेच्या आई-वडिलांकडून घेतलेल्या आधार कार्डचा त्याने कुठे गैरवापर केला? या सर्व बाबींचा सखोल तपास होणे गरजेचे आहे,” असा युक्तीवाद त्यांनी केला.
पाण्यातून गुंगीचे औषध आणि संशयास्पद कृत्ये
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरात महिलांना पिण्याच्या पाण्यातून काही संशयास्पद औषधे देत असे, ज्यामुळे त्यांना गुंगी येत असे. “या औषधांचे स्वरूप काय होते आणि यात खरातला आणखी कोणी साथ दिली आहे का? याचा शोध घेण्यासाठी 7 दिवसांची कोठडी आवश्यक आहे,” अशी मागणी तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खरातची 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
बचाव पक्षाचा पवित्रा
खरातचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध करताना सांगितले की, “आरोपीला यापूर्वीच 14 दिवसांची कोठडी देण्यात आली होती आणि त्यात बराच तपास झाला आहे. गर्भपाताचा जो आरोप केला जात आहे, त्याचा नेमका कालावधी काय? तसेच अद्याप एफआयआरची प्रत मिळालेली नाही.”