मुंबई: मध्यपूर्वेत सुरू असलेला इराण–इस्रायल संघर्ष आणि त्यात अमेरिकेचा वाढता सहभाग यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. दररोज होत असलेल्या हल्ल्यांमुळे या संघर्षाचे परिणाम जगभर जाणवू लागले असून त्याची झळ भारतालाही बसत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या तक्रारी देशभरातून पुढे येत आहेत.
देशातील अनेक भागांमध्ये घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. शेतीसह विविध क्षेत्रांवर या परिस्थितीचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. गॅस तुटवड्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सर्व पक्षांना विश्वासात घेऊन ठोस धोरण जाहीर करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या मुद्द्यावर सरकारवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वक्तव्यातून महाराष्ट्रात गॅसचा तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. “सरकार केवळ घरगुती गॅस उपलब्ध करून देऊ शकते, मात्र व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देऊ शकत नाही,” असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्याचा दावा पटोले यांनी केला.
यावरून राज्यात गॅसचा तुटवडा असल्याचे सरकारने अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे, असे पटोले म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या राज्यातील परिस्थिती गंभीर असून स्वयंपाकघरापासून ते हॉटेल व्यवसायापर्यंत गॅस नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तरीही सरकार गॅस तुटवडा नसल्याचा दावा करत आहे, जो पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी पटोले यांनी कोरोना महामारीच्या काळातील परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्या काळात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देशाच्या सीमा बंद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो सल्ला न ऐकल्याने भारताला मोठी किंमत मोजावी लागली, असा आरोप त्यांनी केला.
पटोले यांनी पुढे आरोप केला की, मुख्यमंत्री फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. गॅस तुटवड्यामुळे लहान तसेच मोठ्या उद्योगांनाही फटका बसला असून काही कारखाने बंद पडल्याची स्थिती आहे. या परिस्थितीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि यासंदर्भातील प्रश्न सभागृहात विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुकांबाबत बोलताना पटोले म्हणाले की, या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून याबाबतचा पुढील निर्णय पक्षाची संयुक्त बैठक घेऊन ठरवला जाईल.
एकूणच एलपीजी गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात हा विषय अधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे.