मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान 1 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या बैठकीला वेगवेगळ्या विभागाचे महत्वाचे मंत्री या बैठकीला उपस्थित होते, मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थितीत पाहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी असलेल्या या बैठकीत एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समोर आले.
शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. तसेच 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडे पाटबंधारा प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या बैठकीत गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभआगा या विभागाअंतर्गतही काही निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
– नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)
– शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)
– सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
– कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी
आजच्या राज्यमंत्री बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले होते. शिवसेना पक्षनाव आणि 'धनुष्यबाण' या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या निर्णायक सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐनवेळी मंत्रिमंडळ बैठक सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आज उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली.
त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. 2 सप्टेंबरपासून सरन्यायाधीशांच्या पीठासमोर शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होत असल्याने, या कायदेशीर लढाईची पूर्वतयारी करण्यासाठी शिंदे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे सत्ताधारी गोटात आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, ते दिल्लीत वकिलांसोबतच काही केंद्रीय नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.