नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा आज, गुरुवारी फैसला होणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 'हातात आलेला घास ओठाशी जाताना पडू नये', यासाठी भाजपने पूर्ण खबरदारी घेतली आहे. नगरसेवकांची पळवापळवी आणि फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी भाजपने सर्व 65 नगरसेवकांना बुधवारीच 'अज्ञात स्थळी' हलवले असून, नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा थरार पाहायला मिळत आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 65 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर शिवसेनेकडे 42 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. आकडेवारीच्या खेळात भाजपचे पारडे जड असले, तरी राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. 42 चे संख्याबळ असतानाही शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न होता, अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा: Jay Ajit Pawar : अजित पवारांच्या आठवणीत जय पवारांची आणखी एक भावनिक पोस्ट; म्हणाले, "तुमचे शब्द कायम माझ्या मनात..."
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे काही नाराज नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. भाजपच्या गोटातील साधारण 12 नगरसेवक फुटू शकतात आणि त्या जोरावर सत्तेची 'मॅजिक फिगर' गाठू, असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या 65 च्या आकड्याला सुरुंग लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, 'सावध तो सुखी' याप्रमाणे भाजपने कोणताही धोका न पत्करता त्यांच्या नगरसेवकांची अभेद्य तटबंदी उभारली आहे. बुधवारी दुपारपासूनच भाजपच्या सर्व नगरसेवकांना एका गुप्त ठिकाणी 'गेट-टुगेदर'च्या नावाखाली हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकांचे मोबाइल फोन 'नॉट रिचेबल' झाले असून, त्यांचा बाह्य जगाशी संपर्क तोडण्यात आला आहे. आज मतदानाच्या वेळी या सर्वांना थेट महापालिका मुख्यालयात आणले जाणार आहे.
नवी मुंबई हे गणेश नाईक यांचे बालेकिल्ले मानला जातो. मात्र, संख्याबळ कमी असतानाही शिवसेनेने दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करून थेट नाईकांच्या वर्चस्वालाच आव्हान दिले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आजची निवडणूक ही केवळ पदाची नसून, नवी मुंबईतील राजकीय अस्तित्वाची लढाई बनली आहे. दुपारपर्यंत हा राजकीय सस्पेन्स संपून नवी मुंबईवर कोणाचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट होईल.
हेही वाचा: Stock Market Today: सेन्सेक्स 83 हजारांच्या खाली? निफ्टीही गडगडला; वाचा शेअर बाजारातील पडझडीचे नेमके कारण काय?