राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाकडून सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले. एकूण 143 सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक असून, या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता.
मात्र, काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निर्णय न झाल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निवडणुकांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
याचपार्श्वभूमिवर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर आज होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाचा कौल मतदारराजा कोणाच्या नावाने देणार आहे हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. दरम्यान आज होणाऱ्या मतमोजणीच्या आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात तणाव किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणूक आणि बाईक रॅली न काडण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहे.