Legislative Council Election: विधानपरिषदेच्या आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचे म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे जागावाटपाचे सूत्र जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर पदवीधर आणि पुणे पदवीधर या दोन महत्त्वाच्या जागा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यावर महायुतीतील नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते. तिन्ही पक्ष या निवडणुका पूर्ण एकजुटीने लढण्याच्या तयारीत आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून तिढा कायम
जागावाटपाचे बहुतांश चित्र स्पष्ट झाले असले तरी पुणे शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. सध्या या जागेवर काँग्रेसचे जयंत आसगावकर आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा खेचून आणण्यासाठी महायुतीने विशेष प्लॅनिंग सुरू केले आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पुणे विभागातील विविध शिक्षक संघटनांशी संपर्क साधत मोर्चेबांधणी मजबूत केली आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही अनेक स्थानिक मातब्बर नेते या जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे ही जागा अखेर कोणाच्या पदरात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती एकत्र लढण्यावर ठाम
विरोधी पक्षांनी उभारलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी महायुतीने विधान परिषदेच्या सर्व जागांवर एकत्रित ताकद लावण्याचा निर्धार केला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचा पेच सोडवण्यासाठी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये लवकरच अंतिम टप्प्यातील बैठक पार पडणार आहे. ही जागा वगळता इतर सर्व 4 जागांवर समन्वयाने उमेदवार निश्चित करण्यात आले असून, लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा महायुतीकडून केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.