पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, भाजप आणि शिवसेनेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यावर निवडणुकीत बंडखोरी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुण्यात महायुतीचे नेते एकत्र राहिले असते तर विजयाची समीकरणे पूर्णपणे वेगळी असती, असा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आता दोन्ही पक्षांमधील हा वाद राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.
धंगेकरांमुळेच महायुतीचा पराभव झाल्याचा भाजपचा दावा
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितले की, निवडणुकीच्या ऐनवेळी महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक बंडखोरी पाहायला मिळाली. शिवसेनेने सुरुवातीला मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला होता, मात्र तो अर्ज नंतर मागे घेण्यात आला आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. सानप यांना निवडणुकीत 16,000 मते मिळाली, ही मते जर महायुतीच्या उमेदवाराला ट्रान्सफर झाली असती तर पहिल्याच फेरीत विजय निश्चित होता. परंतु, रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर विरोधी उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या पोस्ट करून महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाचा मार्ग सुकर केला, असा दावा बन यांनी केला.
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर आणि कारवाईवर प्रश्नचिन्ह
रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत भाजपने आता थेट त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. अमरावतीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या बंडखोरांवर भाजपने तातडीने 6 वर्षांसाठी निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. त्याच धर्तीवर शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने शिंदेंच्या नेतृत्वाखाली धंगेकरांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. जर समन्वय राखला असता आणि वरिष्ठांनी वेळीच लक्ष घातले असते, तर ही नामुष्की ओढवली नसती, असे भाजपचे म्हणणे आहे.
हेही वाचा – सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत नवा वाद! उमेश पाटील यांच्या नियुक्तीवर श्रीवास्तवांचा आक्षेप
धंगेकरांचे राजकीय अस्तित्व आणि भविष्यातील समीकरणे
रवींद्र धंगेकरांच्या व्यक्तिगत राजकीय वजनावर जोरदार टीका करताना भाजप प्रवक्त्यांनी म्हटले की, धंगेकर यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांचे वैयक्तिक अस्तित्व काहीही नसून ते केवळ शिवसेना महानगरप्रमुख या पदावर असल्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना आणि सोशल मीडिया पोस्टना महत्त्व दिले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील हा अंतर्गत तणाव मिटवण्यासाठी वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.