शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाच्या महिला आघाडीने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच ‘पूर्णेकरांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,’ असा इशारा महिला आघाडी प्रमुख रेखा खोपकर यांनी दिला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
यावेळी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यावरून होत असलेल्या टीकेलाही खोपकर यांनी उत्तर दिले. ‘मृतदेहाची विटंबना करण्याचा आमचा उद्देश नव्हता. पोलिसांकडून पहिल्या एफआयआरच्या नोंदणीमध्ये झालेल्या विलंबामुळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला,’ असा दावा त्यांनी केला. तसेच पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी काही व्यक्तींविषयी संशय व्यक्त केल्यानंतर त्यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला. या नावांसाठी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप महिला आघाडीने फेटाळला. कुटुंबीयांनीच संशय व्यक्त करून संबंधित नावांचा एफआयआरमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती, असा दावा करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.