Prajakt Tanpure: विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीने आता आपला मोर्चा शरद पवार गटाच्या बालेकिल्ल्यांकडे वळवला आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते प्राजक्त तणपुरे यांनी माघार घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी तणपुरे यांची भेट घेतल्याने, तणपुरे लवकरच 'कमळ' हाती घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तणपुरेंची माघार
भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महायुतीने येथे अक्षय कर्डिले यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, शरद पवार गटाचे खंबीर नेते मानले जाणारे प्राजक्त तणपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हापासूनच ते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राम शिंदेंचे सूचक विधान: "फडणवीस सुदर्शन चक्र फिरवणार"
आज राम शिंदे आणि प्राजक्त तणपुरे यांच्यात जवळपास एक तास खलबतं झाली. या गुप्त भेटीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत सूचक वक्तव्य केले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात येत असून ते 'सुदर्शन चक्र' फिरवणार आहेत," असे शिंदे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे प्राजक्त तणपुरे यांचा भाजप प्रवेश आता केवळ औपचारिकता उरल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - Yunus Shaikh: 'आम्हाला टार्गेट केलं जातंय...'; सहर शेख यांच्या वडिलांचा दावा, बोगस प्रमाणपत्राच्या आरोपावर भरपत्रकार परिषदेत दाखवली महत्त्वाची कागदपत्रे
महाविकास आघाडीची गळती थांबेना
निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून नेत्यांचे बाहेर पडण्याचे सत्र अद्याप थांबलेले नाही. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जर प्राजक्त तणपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर नगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. पवारांचे निष्ठावान सहकारी भाजपच्या गळाला लागल्यास मतदारसंघातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.