BMC Politics: मुंबई महानगरपालिकेत (BMC) प्रथमच स्पष्ट बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजप महायुतीला एका अत्यंत मोठ्या राजकीय घडामोडीचा सामना करावा लागला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर महापालिका प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. मनपाच्या सुधार समितीने चार अत्यंत वादग्रस्त प्रस्ताव मंजुरी न देता फेरविचारासाठी पुन्हा प्रशासनाकडे परत पाठवले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, भाजप आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात थेट हस्तक्षेप केला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे आदित्य ठाकरेंनी स्वागत केले असून, याला ‘मुंबईकरांचा विजय’ असे संबोधले आहे.
‘मातोश्री’वरून मुख्यमंत्र्यांना थेट फोन
मुंबई मनपाच्या सुधार समितीमध्ये अनेक दिवसांपासून वादात अडकलेले 4 महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. मात्र, आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘शिंदे गट मुंबईच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा घणाघाती आरोप केला होता. या तीव्र विरोधानंतर ‘मातोश्री’वरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्याशी झालेल्या संभाषणांनंतर, आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना या प्रस्तावांमधील तांत्रिक त्रुटींची सविस्तर माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फडणवीस यांनी रात्रीच भाजप नगरसेवकांकडून या प्रस्तावांचा अहवाल मागवला आणि तूर्तास हे प्रस्ताव मंजूर न करण्याचे आदेश दिले. या फोन कॉलनंतर झालेल्या वेगवान घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष टळला असला, तरी मुख्यमंत्री आणि मातोश्री मधील या थेट समन्वयामुळे शिंदे गटाला मात्र मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Big win for Mumbai!
Impact of our Press Conference and appeal! After our press conference yesterday the Improvement Committee of the BMC has referred back all the proposals of: ? Privatising the @mybmc ’s blood banks (always have been free and with BMC) ? Converting the… — Aaditya Thackeray (@AUThackeray) May 27, 2026
प्रशासनाने माघार घेतलेले ‘ते’ 4 मोठे प्रस्ताव नेमके कोणते?
सुधार समितीचे अध्यक्ष आणि प्रशासनाने ज्या 4 प्रस्तावांवर तूर्तास ब्रेक लावला आहे, त्यात मुंबईच्या मोक्याच्या जागा आणि आरोग्याशी संबंधित विषयांचा समावेश आहे. पहिला प्रस्ताव सेव्हनहिल्स रुग्णालयाचा असून, पीपीपी (PPP) मॉडेलच्या नावाखाली या रुग्णालयाचे खासगीकरण केले जाणार होते. दुसरा प्रस्ताव 5 वेगवेगळ्या उपनगरीय रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांच्या पीपीपी मॉडेलशी संबंधित होता. विशेष म्हणजे या प्रस्तावाला शिंदे गटाच्याच नगरसेवकांनीही फेरविचाराची मागणी करत आदित्य ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. तिसरा प्रस्ताव वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या एक्झिबिशन सेंटरचा (प्रदर्शनी केंद्र) होता, तर चौथा प्रस्ताव मलबार हिल परिसरातील ‘ग्रीन झोन’च्या (हरित क्षेत्र) नियमांमध्ये बदल करण्याचा होता. आदित्य ठाकरेंच्या तीव्र आक्षेपामुळे सुधार समितीच्या अध्यक्षांनी कोणतीही चर्चा न करता हे सर्व प्रस्ताव प्रशासनाकडे पुन्हा तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.