Manoj Jarange Patil: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अवघ्या दोन दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या असताना, राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. विशेषतः देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. अशातच मराठा आरक्षण आंदोलनातून राज्यभर चर्चेत आलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठी आणि निर्णायक भूमिका जाहीर केली आहे.
मुंबईत भाजपविरोधात ठाकरे बंधूंनी युती केल्यानंतर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी ठाकरे बंधूंना उघडपणे पाठिंबा देत, मुंबईतील मराठा समाजाने कोणाच्या पाठीशी उभे राहावे, हे स्पष्ट केले आहे. “मुंबईचे अस्तित्व राखायचे असेल, तर ते ठाकरे बंधूंच्याच हातात शोभून दिसेल,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’ महायुतीसाठी निर्णायक ठरला होता. भाजपची मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या घसरली होती आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जागा महायुतीला गमवाव्या लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात जरांगे पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा देत हा सस्पेन्स संपवला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत एक परिपत्रकही काढले असून, त्यात संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि कोकणातील मराठा बांधवांनी मुंबईसाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. “मुंबई १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून उभी राहिली आहे. ही मुंबई मराठी माणसांची आहे, महाराष्ट्राची आहे,” असे सांगत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
आपल्या आवाहनात जरांगे यांनी आझाद मैदानातील मराठा आंदोलनाचाही उल्लेख केला. आंदोलनादरम्यान झालेली कथित अडवणूक, मूलभूत सुविधांचा अभाव आणि मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची आठवण करून देत त्यांनी “आता परतफेडीची वेळ आली आहे,” असा इशारा दिला. “ही लढाई शेवटची आहे. मराठी अस्मितेची आणि मुंबई वाचवण्याची,” असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला ठाम भूमिका घ्यायला सांगितले.
मनोज जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकारण अधिकच तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंना मिळालेला हा पाठिंबा कितपत निर्णायक ठरतो, हे निकालातून स्पष्ट होईल. मात्र, ‘जरांगे फॅक्टर’ पुन्हा एकदा शहरी राजकारणात प्रभाव टाकणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.