मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता; 2 बड्या मंत्र्यांना नारळ, श्रीकांत शिंदेंना मिळणार संधी?

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 8 अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, या यादीतून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा या दोन वरिष्ठ नेत्यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता; 2 बड्या मंत्र्यांना नारळ, श्रीकांत शिंदेंना मिळणार संधी?
Modi Cabinet Reshuffle

Modi Cabinet Reshuffle 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच व्यापक फेरबदल आणि विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 8 अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, या यादीतून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा या दोन वरिष्ठ नेत्यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपुष्टात येत आहे. भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने या दोन बड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

संसदेचे सदस्यत्व अनिवार्य

संसदेच्या नियमानुसार, कोणत्याही मंत्र्याला आपल्या पदावर कायम राहण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य असणे आवश्यक असते. हरदीपसिंग पुरी 2018 पासून उत्तर प्रदेशातून राज्यसभेत प्रतिनिधित्व करत असून, 2024 पासून त्यांच्याकडे केंद्र सरकारचे महत्त्वाचे पेट्रोलियम मंत्रालय आहे. परंतु, राज्यसभेची नवी उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांना पुढील 6 महिन्यांच्या आत संसदेवर निवडून यावे लागेल अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. यामुळे पुरी यांच्या राजीनाम्याची उलटी गिनती सुरू झाल्याचे मानले जात असून, रिकाम्या होणाऱ्या जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा –  राज्यसभा निवडणुकांसाठी भाजपची मोठी रणनीती! 8 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर

खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी?

दुसरीकडे, महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) लोकसभेत 13 खासदार आहेत. पक्षाचे वाढलेले संख्याबळ लक्षात घेता केंद्रात आणखी एक महत्त्वाचे मंत्रिपद मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. भाजप आपल्या कोट्यातील रिक्त जागा शिंदे गटाला देऊन मित्रपक्षाला खूश करणार की स्वतःकडेच ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ या धोरणांतर्गत उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष पंकज चौधरी आणि दिल्ली भाजप अध्यक्ष हर्ष मल्होत्रा या मंत्र्यांचीही गच्छंती होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number