मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणधुमाळीसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली असून, मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी 'बेस्ट' बसही या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. निवडणूक कामांसाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार, बेस्ट उपक्रमाने तब्बल 1065 बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 13 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून या विशेष सेवेला प्रारंभ होणार असून 15 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत या बसेस निवडणूक कर्तव्यावर तैनात असतील.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र मेहनत घेत असतात. या कर्मचाऱ्यांची तसेच सुरक्षा रक्षकांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी या बसेसचा प्रामुख्याने वापर केला जाणार आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या मतदान केंद्रांपर्यंत पोहचण्यासाठी बेस्टच्या या गाड्या एकप्रकारे आधार ठरणार आहेत. विशेषतः दूर असलेल्या आणि गर्दीच्या भागात कर्मचाऱ्यांना वेळेत पोहचवण्यासाठी या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा: Eknath Shinde On Thackeray Brothers : 'निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो...', शिवतीर्थावरून एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर घणाघात
सध्या बेस्टच्या ताफ्यात एकूण 2700 बसेस कार्यरत आहेत. यापैकी एक हजारांहून अधिक बसेस निवडणूक कामासाठी वळवण्यात आल्याने, मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने हे मोठे पाऊल उचलले आहे. ताफ्यातील जवळपास 40 टक्के बसेस या कामासाठी तैनात करण्यात आल्याने निवडणूक प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
बेस्ट आणि निवडणुकांचे नाते तसे जुनेच आहे. यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही बेस्टने आपली सेवा चोख बजावली होती. त्याच परंपरेचे पालन करत, यंदाही महानगरपालिका निवडणुकीच्या या महायज्ञात बेस्टचे सारथी आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत. कोणत्याही तांत्रिक अडचणीविना ही वाहतूक सेवा सुरू राहावी, यासाठी आगारांमध्ये विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
13 जानेवारीच्या रात्रीपासूनच या बसेस ठराविक केंद्रांकडे रवाना होण्यास सुरुवात होईल. निवडणूक साहित्य, ईव्हीएम मशिन्स आणि मतदान केंद्रावरील कर्मचारी यांची सुरक्षा आणि वेगवान हालचाल ही या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे आहेत. 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सर्व कर्मचाऱ्यांना आणि साहित्याला सुरक्षितपणे संकलन केंद्रांपर्यंत पोहचवूनच या 'बेस्ट'चा हा निवडणूक प्रवास थांबणार आहे.
हेही वाचा: BMC : 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, 'दक्षता पथका'ची स्थापना