दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर माकपच्या (CPM) वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, हे आंदोलन काही वेळातच अत्यंत आक्रमक झाले आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कारवाई करत आंदोलनकर्त्यांची जोरदार धरपकड सुरू केली. या कारवाईदरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी ‘मुंबई पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी आलेले प्रसिद्ध गांधी घराण्याचे वंशज तुषार गांधी आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची धाव
पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तातडीने डीएन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुषार गांधी यांच्यासह सर्व आंदोलकांना तात्काळ विनाअट सोडावे, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर व आतमध्ये जोरदार ठिय्या मांडला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ग्रँट रोड परिसरात ताब्यात घेतले असून त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईमुळे ऑगस्ट क्रांती मैदान आणि लगतच्या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मैदानावर जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत.
हेही वाचा – जंतर-मंतरवर गोंधळ! अरविंद केजरीवाल पोलिसांच्या ताब्यात;‘आप’च्या अनेक नेत्यांची धरपकड
नाना चौक स्कायवॉक परिसरासह अंधेरीत कडक बंदोबस्त
तणावाची वाढती परिस्थिती पाहता नाना चौक स्कायवॉककडे जाणारे मार्ग तात्पुरते प्रतिबंधित करण्यात आले असून आंदोलकांनी पोलिसांकडे त्यांच्या अटकेचे अधिकृत आदेश दाखवण्याची मागणी केली. दुसरीकडे, अंधेरी पश्चिम येथील डीएन नगर पोलीस ठाण्याबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी शिवसेना (युबीटी) आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमू लागल्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेल्या दडपशाहीविरोधात मुंबईत सुरू झालेला हा विरोध आता अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत असून, या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.