Balasaheb Sarwade Death Case: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर शहर एका भीषण हत्याकांडाने हादरले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांना संपवण्यात आलं. या घटनेनंतर सोलापुरात तीव्र तणाव निर्माण झाला असून, आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
माझे पप्पा आणून द्या… चिमुकल्यांचा टाहो अन् अमित ठाकरेही गहिवरले
अमित ठाकरे सरवदे यांच्या निवासस्थानी पोहोचले असता, तेथील दृश्य हृदयद्रावक होते. ‘माझे पप्पा मला परत आणून द्या, मी त्यांना भेटलेच नाही,’ असा आक्रोश बाळासाहेबांच्या लहान मुलीने करताच उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. स्वतः अमित ठाकरेही हा प्रसंग पाहून भावूक झाले होते.
अमित ठाकरे काय म्हणाले?
तुमचे राजकारण काहीही असो, पण सत्तेसाठी कोणाचा बळी घेऊ नका, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणाची पातळी इतक्या खालच्या थराला गेली आहे. पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यापर्यंत ठीक होते परंतु आता लोकांचा संपवण्यापर्यंत मजल गेली, ते फक्त निवडणुकांसाठी….मी इथे आलोय तसं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन इथली परिस्थिती काय आहे ते पाहिले पाहिजे. अशा निवडणुका असतील तर आम्हाला निवडणुका नको, आम्ही सगळे अर्ज परत घेतो. तुम्ही जिंका. कुणाच्या मृत्यूचं राजकारण करायला मी इथे आलो नाही, असंही यावेळी अमित ठाकरेंनी नमूद केलं.
हत्येचा घटनाक्रम आणि पोलीस कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि अपक्ष (बंडखोर) उमेदवार रेखा सरवदे यांच्यात अर्ज मागे घेण्यावरून वाद झाला होता. याच वादातून बाळासाहेब सरवदेंना संपवण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेसह 15 जणांवर गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपींवर मोक्का लावा; कुटुंबियांची मागणी
मृत बाळासाहेब यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी आरोप केला आहे की, किरण देशमुख आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला. आमचे कोणाशीही जुने भांडण नव्हते, केवळ निवडणुकीसाठी माझ्या पतीचा जीव घेतला. सर्व आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.