Heena Gavit Audio Clip Controversy : कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात अडचणीत आलेले भारतीय जनता पक्षाचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार पोलिसांनी अखेर मोठी कारवाई केली आहे. धुळे रोड परिसरातून नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने गुरुवारी 6 ऑगस्टच्या रात्री 8 च्या सुमारास चौधरी यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांना तातडीने नंदुरबार येथे आणण्यात आले असून, वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.
डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य अन् ॲट्रॉसिटीचा गुन्हा
भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासंदर्भात ऑडिओ क्लिपमध्ये अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप विजय चौधरी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहन गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी विजय चौधरी यांच्या स्वीय सहायकालादेखील (PA) पोलिसांनी याच प्रकरणात अटक केली आहे.
विशेष पथकाची स्थापना अन् मुलाचीही चौकशी
गुन्हा दाखल झाल्यानंतर या संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या पथकाने धुळ्यात सापळा रचून ही कारवाई केली. याच प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी विजय चौधरी यांचा मुलगा मंदार चौधरी यालाही पुणे येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी वाद निर्माण झाल्यानंतर भाजप पक्षाने विजय चौधरी यांना यापूर्वीच संयोजक पदावरून हटवले होते. दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिप बनावट (AI आधारित) असल्याचा दावा चौधरी यांनी केला होता, मात्र पोलिसांकडून ऑडिओचे व्हॉइस सॅम्पल आणि फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. या अटकेमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात विशेषतः सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.