नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिल्याचे समोर आले आहे. विविध 14 मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी परिसरात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. मात्र मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यावर विद्यार्थी ठाम असून 14 दिवसांच्या उपोषणामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची चिंताजनक माहिती समोर आली होती. आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास बैठक पार पडली. यादरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा केल्याची चर्चा सुरु आहे.
विद्यार्थी शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर नरहरी झिरवळ आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आंदोलनस्थळी दाखल झाले होते. यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना “खाऊन-पिऊन आंदोलन करा,” असा सल्ला दिला. “खाऊन-पिऊन आंदोलन करा… मी जे आंदोलन करायचो, ते चोरून खायचं आणि आंदोलन करायचो,” असा झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. यावर दरम्यान, नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी “खाऊन-पिऊन आंदोलन करायचे असते तर तुम्ही आलेच नसते. झिरवळांना मजाक करण्याची सवय आहे.” असा झिरवळांना टोला लगावला. झिरवळ यांच्या वक्तव्यामुळे आंदोलनाची थट्टा केल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
दरम्यान यावेळी मंत्री अशोक उईके यांनी उपोषणावर माहिती देत सांगितले की, विद्यार्थी आपल्या हक्कासाठी बोलू लागले आहेत, याचा मला अभिमान आहे. काही तांत्रिक बाबींवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा सकारात्मक असली तरी उपोषणावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांनी दोन दिवसांची मुदत मागत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.