Nashik Election 2026: पदरी उपेक्षाच! नाशिक भाजपच्या सरचिटणीसाचा राजीनामा; म्हणाले… "आता मोदींचा फोन आला तरी…"

या बंडखोरीमुळे भाजपच्या हक्काच्या प्रभागात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Nashik Election 2026:  पदरी उपेक्षाच! नाशिक भाजपच्या सरचिटणीसाचा राजीनामा; म्हणाले… &quotआता मोदींचा फोन आला तरी…&quot

नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकरोड येथील भाजप कार्यालयात गुरुवारी निष्ठावान कार्यकर्त्यांचा राडा सुरू असतानाच, पंचवटीतील भाजपचे बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या प्रभाग एकमध्ये मोठी बंडाळी झाली आहे. पक्षाचे शहर सरचिटणीस अमित घुगे यांनी पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप करत थेट अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या हक्काच्या गडाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

20 वर्षांची निष्ठा वाऱ्यावर?

गेल्या दोन दशकांपासून भाजपच्या युवक मोर्चापासून ते शहर सरचिटणीसपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडणाऱ्या अमित घुगे यांनी पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडली. "मी भाजपला आईसमान मानतो, पण पक्षातील काही प्रवृत्तींनी मला अपमानास्पद वागणूक दिली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. निष्ठेची किंमत शून्य ठरली असून, निष्ठावंतांना डावलून नव्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप करत घुगे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

हेही वाचा: Marathi Sahitya Sammelan : विश्वास पाटील यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी', संभाजी ब्रिगेड आक्रमक, साहित्य संमेलन उधळवून लावण्याचा इशारा

सर्व्हेत फेरफार आणि नेत्यांवर अविश्वास

घुगे यांनी उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "गेल्या निवडणुकीत आणि यावेळीही मी सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर होतो, तरीही मला उमेदवारी नाकारण्यात आली. सर्वेक्षणाच्या आकडेवारीत जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आल्याचा मला संशय आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला. तसेच, उमेदवारीसाठी शहराध्यक्ष आणि स्थानिक आमदारांना तब्बल 15 वेळा फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही, हा थेट विश्वासघात असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रक्रियेत मंत्री गिरीश महाजन यांचा थेट संबंध नसला तरी स्थानिक नेत्यांनीच घात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"पंतप्रधानांचा फोन आला तरी माघार नाही"

राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा रंगली ती घुगे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची. "मी भावनेच्या भरात हा निर्णय घेतलेला नाही, तर ही लढाई अन्यायाविरोधात आहे. आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला, तरी मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही," असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. घुगे यांनी आपला प्रचार आधीच सुरू केला असून,निकषांची अट आपल्यासाठी महत्त्वाची नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

भाजपच्या गणितात मोठी अडचण

नाशिक महापालिकेत सत्ता राखण्याचे भाजपचे स्वप्न असतानाच, पक्षाच्या अंतर्गत गोटातून झालेली ही बंडाखोरी भाजपच्या अधिकृत उमेदवारासाठी डोकेदुखी ठरू शकते. प्रभाग एकमध्ये घुगे यांची वैयक्तिक पकड मजबूत असल्याने, ते कोणाची मते खाणार आणि याचा फायदा कोणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक भाजपमधील ही ठिणगी आता संपूर्ण शहरात पेटणार की वरिष्ठ नेते घुगे यांची समजूत काढण्यात यशस्वी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: BMC Election 2026: निवडणुकीआधीच गुलाल उधळला; शिंदेंच्या शिवसेनेची आणि भाजपची सरशी, पाहा कुठे कुणी मारली बाजी?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number