Nashik Tapovan Controversy: तपोवन प्रकरणावरून राज ठाकरे मैदानात; सरकारला दिला थेट इशारा

नाशिक तपोवन परिसरातील झाडांच्या प्रस्तावित तोडीवरून वातावरण तापले असून पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरे यांनी सरकारवर परखड टीका करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

Nashik Tapovan Controversy: तपोवन प्रकरणावरून राज ठाकरे मैदानात; सरकारला दिला थेट इशारा

Raj Thackeray tweet: राज्यातील राजकीय वातावरण सध्या अक्षरशः पेटलेले आहे. एकीकडे निवडणुकीची चाहूल तर दुसरीकडे नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून उभा राहिलेला संघर्ष… या दोन्ही घडामोडींमुळे महाराष्ट्रात राजकीय तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामचा विस्तार करण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून तपोवनातील 54 एकर जागा मोकळी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आणि त्यात 1,825 झाडांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘तपोवन वाचवा, नाशिक वाचवा’ मोहीम सुरु केली. जनसुनावण्यांमध्ये ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी महापालिकेला चांगलंच धारेवर धरलं, मात्र तरीही सरकारकडून या निर्णयावर कोणतीही माघार घेतलेली दिसत नाही.

अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं ट्विट मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी थेट सरकारला लक्ष्य करत पर्यावरणाच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कुंभमेळा हा नाशिकसाठी नवा नाही. आमच्या महापालिकेच्या सत्ताकाळातही कुंभमेळा झाला. त्यावेळी भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या, पण एकही झाड तोडावं लागलं नाही,” असे सांगत त्यांनी सध्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शासन 1800 पेक्षा जास्त झाडे तोडण्याचा निर्णय घेत आहे आणि त्याची भरपाई म्हणून नवीन झाडे लावली जातील, हे आश्वासन म्हणजे केवळ “पोकळ शब्द” आहेत. “जर सरकारकडे पाचपट झाडे लावण्यासाठी जमीन आहे तर साधुग्राम तिथेच का बांधत नाहीत?” असा थेट सवालही त्यांनी केला. तसेच पूर्वी भाजप सरकारने केलेल्या “कोट्यवधी झाडे लावली” या घोषणेचा टोलाही त्यांनी लगावला “ती झाडे कुठे दिसत नाहीत,” अशी कठोर टिप्पणी त्यांनी नोंदवली.

त्याहूनही पुढे जात राज ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले, “आज झाडतोडीचं कारण दाखवून जमीन सपाट केली जाणार आहे आणि नंतर तीच जमीन काही लाडक्या उद्योगपतींना दिली जाणार! सत्ताधारी मंत्री, आमदार आणि त्यांचे नातेवाईक उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करताना दिसतात!” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:Nashik Tapowan: ” वृक्षांवरील हा हल्ला अमान्य” तपोवनातील वृक्षतोडी विरोधात अभिनेते सयाजी शिंदे आक्रमक

नाशिककरांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर करत त्यांनी संदेश दिला, “नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू. यात राजकारण काही नाही. निवडणुका झाल्यानंतरही आम्ही हाच विरोध कायम ठेवणार.” तसेच सरकारला स्पष्ट इशारा देत त्यांनी लिहिले, “उगाच संघर्ष वाढवला तर या लढ्यात मनसे जनतेसोबत उभी राहीलच!”

राज ठाकरे यांच्या या परखड भूमिकेमुळे नाशिकच्या तपोवन प्रश्नात आता नवीन कलाटणी येण्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमींचा संताप, महापालिकेचा निर्णय, सरकारची भूमिका आणि आता मनसेचा आक्रमक पवित्रा या सर्वामुळे राज्यातील राजकारण पुढील काही दिवसांत आणखी तापणार हे निश्चित.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number