Navneet Rana NCP Entry Condition for Rajya Sabha : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या अंतर्गत गोटात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या खासदारकीच्या जागेसाठी सुरुवातीला भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, ही उमेदवारी हुकल्यानंतर आता स्वतः नवनीत राणा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर (Facebook) एक मोठी पोस्ट शेअर करत सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या त्या बैठकीत नेमके काय घडले, याचा जाहीर खुलासा केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवारांची होती इच्छा; पण पक्षांतराची अट नडली
नवनीत राणा यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला त्यांना दिल्लीत पाठवण्याची तीव्र इच्छा होती. 'आदरणीय सुनेत्रावहिनी, अजितदादा पवार आणि पार्थदादा पवार यांनी माझ्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास दाखवत मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत स्वतः इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ही खासदारकीची उमेदवारी स्वीकारण्यासाठी मला भारतीय जनता पार्टी सोडून अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची मुख्य अट घालण्यात आली होती, जी अट मला अजिबात मान्य नव्हती,' असा थेट खुलासा नवनीत राणा यांनी केला आहे. कोणत्याही मोठ्या पदासाठी किंवा खासदारकीसाठी आपण आपली मूळ राजकीय विचारधारा बदलणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी केला होता जागा भाजपला सोडण्याचा प्रयत्न
या संपूर्ण पडद्यामागील राजकारणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आणताना नवनीत राणा म्हणाल्या की, ही जागा भाजपला मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनीही मध्यस्थी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरूनच नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही राज्यसभेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याची लेखी व तोंडी विनंती करण्यात आली होती. परंतु, महायुतीमधील जागावाटपाच्या अंतर्गत समीकरणांमुळे आणि काही अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रवादीने ही जागा भाजपला सोडणे शक्य झाले नाही. जागा मिळाली नसली, तरी ऐनवेळी आपल्या नावाचा एवढा मोठा विचार केल्याबद्दल राणा यांनी पवार कुटुंबाचे जाहीर आभार मानले आहेत.
पुतण्याला मंत्रिपद हवे होते; म्हणून छगन भुजबळांचे पत्ता कट
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील बहुतांश वरिष्ठ नेते पूर्णपणे सहमत होते. भुजबळ हे देखील दिल्लीत जाण्यास तयार होते, परंतु त्यांनी या उमेदवारीसाठी एक अत्यंत मोठी अट ठेवली होती. जर आपण राज्यसभेवर गेलो, तर आपल्या जागेवर पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी भुजबळांची इच्छा होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय आणि राज्य श्रेष्ठींनी या अटीला स्पष्ट शब्दांत नकार दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर समीर भुजबळ यांना मंत्रिपद देणे शक्य नसल्याचे भाजप नेतृत्वाने कळवल्यामुळे अखेर छगन भुजबळ यांचे राज्यसभेवर जाणे ऐनवेळी बारगळले आणि विदर्भातील निष्ठावंत नेते राजेंद्र जैन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.