राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील संभाव्य अंतर्गत हालचाली आणि ‘ऑपरेशन तुतारी’ या चर्चांवर आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्षात फूट पडण्याच्या किंवा खासदार वेगळे होण्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना सोनवणे यांनी ‘ऑपरेशन तुतारी’ या चर्चेला थेट फेटाळून लावत हे सर्व म्हणजे “बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी” असल्याचे म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या अफवा केवळ राजकीय वातावरण ढवळून काढण्यासाठी पसरवल्या जात आहेत, मात्र त्यात कोणतेही सत्य नाही.
सोनवणे यांनी स्पष्ट केले की, पक्षातील सर्व आठ खासदार एकसंघ असून त्यांच्यात कोणताही मतभेद नाही. ‘आम्ही आठही खासदार एकजीव आहोत आणि एकत्रच राहणार आहोत,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास असून त्यात कोणताही बदल होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. अलीकडच्या काळात ‘ऑपरेशन टायगर’नंतर ‘ऑपरेशन तुतारी’ राबवले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे सांगत सोनवणे यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.