नाशिक: आजारपणाचं कारण सांगून विदेशवारी करणे नाशिकच्या कामचुकार अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती असताना वरिष्ठांची दिशाभूल करून नाशिकचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र. दा. जगतापने आजारपणाचं खोटं कारण सांगून विदेशवारी करायला गेल्यामुळे या कामचुकार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री (Minister of Ports Development) नितेश राणे यांनी आधीच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तसेच, देशातील युद्धसदृश परिस्थितीचे गांभीर्य पाहता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, नाशिकचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र. दा. जगताप शासकीय कामासाठी हे इगतपुरीच्या न्यायालयात हजर असताना अचानक त्यांची शुगर कमी झाली आणि त्यामुळे त्यांना चक्कर आले. जेव्हा ते शुद्धीत आले तेव्हा त्यांना दवाखान्यातघेऊन जावे लागले. ज्यामुळे, नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर करून तब्येत बरी नसल्याचे त्यांनी भासवले होते. मात्र, प्रत्यक्षात ते विदेशवारीवर गेल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेत, जगताप यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केले होते, त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले होते, कामावर गैरहजर राहिले होते आणि त्यांच्या वरिष्ठांची दिशाभूल केली होती हे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाई करत मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, मंगळवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
कामचुकार अधिकाऱ्यावर काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
निलंबन आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, जगताप यांना निलंबित केले जात आहे तोपर्यंत ते नागपूर प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्तांच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूरमध्येच राहील असेही त्यात नमूद केले आहे. यापूर्वी, लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने दोन वेळा या अधिकाऱ्यावर कारवाई केली होती. त्यामुळे, मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्याबाबत विभागांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जर ते चौकशीत दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ केले जाईल असे म्हटले आहे.