Ambadas Danve On Govt: महाराष्ट्राचे 21 वे आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शुक्रवारी वर्षपूर्ती साजरी केली. या वर्षात फडणवीस सरकारने बहुमताच्या जोरावर सत्ता अधिक स्थिर केली असली, तरी अंतर्गत मतभेद, तक्रारी, ताणतणाव आणि सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता यामुळे आगामी चार वर्षांची वाटचाल आव्हानात्मक राहणार असल्याचे राजकीय वर्तुळातील संकेत आहेत.
दरम्यान, सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नेते अंबादास दानवे यांनी फडणवीस सरकारची 'वर्षभरातील उपलब्धी' असा उपरोधिक उल्लेख करत एक्सवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी विविध घोटाळे, प्रशासनातील त्रुटी, तसेच निर्णय प्रक्रियेतल्या समस्यांचा उल्लेख करून सरकारवर तीव्र टीका केली आहे.
हेही वाचा - Local Body Election : स्थानिक स्वराज्य निवडणूक निकालावर शिक्कामोर्तब! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
अंबादास दानवे यांनी केलेल्या प्रमुख आरोपांचा सारांश
- प्रचंड बहुमत तरी सत्ताधारी पक्षांचा परस्परांवर प्रचंड अविश्वास.
- पार्थ पवार, मंत्री संजय शिरसाट सारख्या घपलेबाजांना राजश्रय.
- लोकांची यथेच्छ धुलाई करणाऱ्या आमदारांना अभय.
- शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतीवर वरवंटा.
- अस्मानी सुलतानी संकटात शेतकरी वाऱ्यावर.
- शासन आपल्या दारी योजना बंद.
- एकमेकांचे पक्ष फोडण्याची सुसाट शर्यत.
- फलटणला महिला डॉक्टरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बदमाशांना अभय.
- स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एक आरोपी अजूनही फरार.
- महादेव मुंडे प्रकरणात केवळ चौकशी, एसआयटीचा फार्स.
- पेपरफुटीमुळे स्पर्धा परीक्षा रद्द केल्याचा विक्रम.
- समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाबाबत चकार चब्द नाही.
- 'योजनादूत'च्या माध्यमातून तरुणाईची फसवणूक.
- लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे गायब.
- शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर.
हेही वाचा - Loan Waiver in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'ही अट' नाही; 25 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
शेवटी, दानवे यांनी उपरोधिकपणे लिहिले, 'अजून बरंच आहे… घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही.' फडणवीस सरकार वर्षपूर्ती साजरी करत असताना विरोधकांनी उघडपणे लावलेले हे आरोप राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांदरम्यान या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आणखी काय आरोप-प्रत्यारोप होणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.