Ameet Satam: मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्वतयारीचा (मान्सून प्रिपेडनेस) आढावा लोकप्रतिनिधींकडून घेतला जात आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, वैधानिक समित्यांचे प्रमुख आणि सर्व आमदार-नगरसेवक आपापल्या परीने विविध भागात जाऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. गेल्या आठवड्यात पूर्व आणि पश्चिम उपनगरांची पाहणी केल्यानंतर, आज शहर भागातील ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह आणि हाजी अली (जी) या मुख्य 3 पंपिंग स्टेशन्सची पाहणी करण्यात आली. भरतीच्या (हायटाईड) काळात समुद्राचे पाणी शहरात शिरण्यापासून रोखण्यात आणि पावसाचे पाणी वेगाने समुद्रात उपसण्यात या पंपिंग स्टेशन्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, ज्यामुळे मुंबईकरांना पाणी साचण्यापासून मोठा दिलासा मिळतो. हे सर्व पंप व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठीच हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा –
गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा
या पाहणीदरम्यान भाजप आमदार अमित साटम यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. गेल्या वर्षी 1 जून रोजी पंपिंग स्टेशन्स सुरू होणार होते, परंतु 26 मे रोजीच पाऊस आल्याने काहीशी अडचण निर्माण झाली होती. या अनुभवातून धडा घेत यंदा मुंबई महानगरपालिकेने आपली 6 मोठी आणि 10 छोटी पंपिंग स्टेशन्स 15 मे रोजीच पूर्णपणे कार्यान्वित (ऑपरेशनल) केली आहेत. याशिवाय, मुंबईतील सखल आणि पाणी साचणाऱ्या छोट्या भागांमध्ये पाण्याचा उपसा करण्यासाठी तब्बल 550 पेक्षा जास्त अतिरिक्त पंप आधीच तैनात (डिप्लॉय) करण्यात आले असून ही यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
आयआयटी बॉम्बेचे ‘अर्ली वॉर्निंग मेकॅनिझम’ ठरणार गेमचेंजर:
यंदाच्या पावसाळ्यात मुंबई पालिकेच्या मदतीला आधुनिक तंत्रज्ञान धावून आले आहे. आयआयटी बॉम्बेने (IIT Bombay) विकसित केलेली एक विशेष ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ मुंबई महानगरपालिकेला दिली आहे. यापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस येणार असल्यास पालिकेला केवळ 3 ते 4 तास आधी माहिती मिळायची. मात्र, या नव्या प्रणालीमुळे आता तब्बल 48 तास म्हणजेच दोन दिवस आधीच पावसाचा अचूक अंदाज मिळणार आहे. यामुळे पालिकेला संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे.
31 मे पर्यंत 100 टक्के नालेसफाईचे उद्दिष्ट; संजय राऊतांवर टीका:
मुंबईतील नालेसफाईचे काम 31 मे पर्यंत 100 टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. काही भागांमध्ये नालेसफाईचे काम असमाधानकारक असल्याचे समोर आल्याने, येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबईच्या महापौर स्वतः त्या ठिकाणी जाऊन पुन्हा पाहणी करणार आहेत. मुंबईकरांना पावसाळ्यात कमीत कमी त्रास व्हावा, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे साटम यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकारांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या विधानांबाबत विचारले असता, अमित साटम यांनी कडक शब्दांत टीका केली. “महाराष्ट्राच्या राजकारणातील विदूषक रोज काय बोलतो, यावर मला प्रतिक्रिया देण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही,” अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.