CM Fadnavis On BJP Victory : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयमी पण आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्राने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून आशीर्वाद दिला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, विजयाने हुरळून न जाता कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हिंदुत्व आणि विकास एकाच नाण्याच्या दोन बाजू
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्या विचारांचा आत्मा हिंदुत्ववाद आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही संकुचित नाही, तर व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही, हेच जनतेने दिलेल्या समर्थनातून सिद्ध झाले आहे.’
29 पैकी 25 महापालिकांत भाजपची सत्ता
निकालाचे चित्र स्पष्ट होताच माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील 29 पैकी तब्बल 25 महानगरपालिकांमध्ये भाजप आपली सत्ता स्थापन करत आहे. मुंबई महापालिकेवरही महायुतीचाच भगवा फडकणार यात आता कोणतीही शंका राहिलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जो विकासाचा अजेंडा मांडला, त्याला जनतेने प्रामाणिकपणे स्वीकारले आहे. हे जनमत सांगते की लोकांना केवळ विकास आणि पारदर्शक कारभार हवा आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांनी विजयाचे श्रेय जनतेला दिले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांचेही आशीर्वाद सोबत असल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यकर्त्यांना इशारा; उन्माद नको!
विजयानंतर कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी कडक संदेश दिला आहे. ‘हा विजय मोठी जबाबदारी घेऊन आला आहे. विजयाचा कोणताही उन्माद नको. जबाबदारीची जाणीव ठेवून जनतेची सेवा करा. लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याला ही संधी मिळाली आहे,’ असंही ते यावेळी म्हणाले.